Rahul Gandhi : 'ऑपरेशन सिंदूर' ही कारवाई की केवळ राजकीय स्टंट'; राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत आपल्या भाषणादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानांवर जोरदार टीका करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान केंद्र सरकारकडून घेतलेल्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत आपल्या भाषणादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानांवर जोरदार टीका करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान केंद्र सरकारकडून घेतलेल्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर निशाणा साधत, "ही लढाई नव्हतीच, कारण लढायची इच्छाशक्तीच नव्हती," असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला.

राहुल गांधी म्हणाले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीच सभागृहात सांगितले की ‘ऑपरेशन सिंदूर’ 1.05 वाजता सुरू झाले आणि फक्त 22 मिनिटांनंतर, म्हणजे 1.35 वाजता भारताने पाकिस्तानशी संपर्क साधून सांगितले की, "आम्ही केवळ नॉन-मिलिटरी टार्गेट्सवर हल्ला केला आहे आणि आम्हाला संघर्ष वाढवायचा नाही."

राहुल गांधी म्हणाले, "दोन लोकांच्या भांडणात एकजण दुसऱ्याला चापट मारतो आणि लगेच सांगतो की आता अजून चापट मारणार नाही, हे हास्यास्पद आहे. आपण पाकिस्तानला आधीच सांगितले की आम्हाला संघर्ष नको आहे. म्हणजेच आपण त्यांना आपली राजकीय कमजोरी दाखवली."

त्यांनी पुढे सांगितले की 1971 मध्ये भारताने जेव्हा बांगलादेश युद्धात निर्णायक विजय मिळवला होता, तेव्हा इंदिरा गांधी यांच्याकडे स्पष्ट राजकीय इच्छाशक्ती होती. त्यांनी जनरल माणेक शॉ यांना ऑपरेशनसाठी हव्या त्या वेळेची मुभा दिली. त्यावेळी अमेरिकेच्या सातव्या ताफ्याची धमकी असूनही भारताने आपल्या धोरणातून माघार घेतली नव्हती.

"पण आजची परिस्थिती वेगळी आहे," असे सांगत राहुल गांधी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय वायूदलाला स्पष्ट आदेश दिले गेले की पाकिस्तानी लष्करी ठिकाणांवर किंवा त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टमवर हल्ला करायचा नाही. यामुळे आपले वैमानिक संरक्षणाशिवाय पाकिस्तानी क्षेत्रात गेले आणि त्यांचे विमाने पाडली गेली.

राहुल गांधी यांचा आरोप होता की, ही रणनीती भारतीय हवाई दलाची चूक नव्हती, तर ही केंद्र सरकारची राजकीय चूक होती. "आपण आपल्या वैमानिकांचे हात पाठच्या मागे बांधून त्यांना युद्धात पाठवले. आणि शत्रूला आधीच सांगितले की आम्ही तुमच्या लष्करी ठिकाणांना हात लावणार नाही," असे त्यांनी ठणकावले.

ते पुढे म्हणाले, "आजच्या काळात जर एखाद्या क्षेत्रात एअर डिफेन्स असेल आणि आपण तिथे एअरक्राफ्ट पाठवले तर ती विमाने पाडली जातीलच. ही रणनीतिक चूक नव्हे, तर राजकीय चूक होती."

राहुल गांधी यांनी यावेळी संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांचाही उल्लेख केला. "त्यांनी म्हटले की आम्ही चुका ओळखल्या आणि पुढील दोन दिवसांनी ती दुरुस्त करून नवीन मोहीम राबवली. पण मी त्यांना सांगू इच्छितो की भारतीय वायूदलाची चूक नव्हतीच. चूक होती ती राजकीय नेतृत्वाची," असे गांधी म्हणाले.

आपल्या भाषणाच्या शेवटी राहुल गांधी यांनी सरकारला आव्हान दिले की त्यांनी स्पष्टपणे सांगावे की ‘ऑपरेशन सिंदूर’ ही एक खरी कारवाई होती की केवळ राजकीय स्टंट. "जर आपण शत्रूला आधीच सांगत असाल की आम्हाला भांडण नको आणि लष्करी ठिकाणांवर हल्ला करणार नाही, तर तो दुसऱ्यांदा का घाबरणार?" असा खडा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला.

राहुल गांधी यांच्या या आक्रमक भाषणामुळे संसदेतील वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधाऱ्यांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची माहिती ज्या पद्धतीने उघड झाली आहे, त्यामुळे या मोहिमेवर आणि सरकारच्या लष्करी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा

Rahul Gandhi : 'ऑपरेशन सिंदूर' ही कारवाई की केवळ राजकीय स्टंट'; राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
Priyanka Gandhi Vadra : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून प्रियांका गांधी वाड्रा यांचा सवाल गृहमंत्र्यांना सवाल
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com