Rahul Gandhi
Rahul Gandhi

"हे मोदींचं सरकार नव्हे, अदानींचं सरकार आहे", राहुल गांधींचं PM नरेंद्र मोदींवर शरसंधान

भंडारा येथील काँग्रेसच्या सभेत राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
Published by :

नरेंद्र मोदी २४ तास कधी धर्माबाबत बोलतील, कधी गरिबांवर बोलतील, कधी हिंदु-मुस्लिम म्हणतील, तर कधी जातीवाद करतील. मोदींनी १० वर्षात उद्योगपतींसाठी सरकार चालवलं. मुंबईतील विमानतळही अदानींना देऊन टाकलं. हे मोदींचं सरकार नव्हे, तर अदानींचं सरकार आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्यावर तोफ डागली आहे. ते भंडारा-साकोलीच्या काँग्रेसच्या सभेत बोलत होते.

जनतेशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले,बेरोजगारी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचा सर्व सांगतात. पण तुम्ही २४ तास टीव्ही पाहिली तर, तुम्हाला बेरोजगारी दिसणार नाही. तुम्हाला महागाईवर बोलणारे दिसणार नाही. तुम्हाला शेतकरी दिसणार नाही. तुम्हाला बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटर दिसतील. तर कधी नरेंद्र मोदी समुद्र किनाऱ्यावर पूजा करताना दिसतील. मजाक बनवून ठेवलाय. कोविडमध्ये लाखो लोकांचा बळी गेला, पण मोदी म्हणतात थाळी वाजवा. लोकांचा मृत्यू होत असताना मोदींनी थाळी वाजवायला सांगितलं. इतर देशातील पंतप्रधान थाळी वाजवत नव्हते, लोकांचा जीव वाचवण्यात व्यग्र होते.

मोदी त्यांच्या भाषणात तुमचं लक्ष विचलित करण्याचं काम ते करतात. अदानी तुमच्या खिशातील पैसा काढण्याचं काम करतात. नरेंद्र मोदी सांगतात, मी ओबीसी आहे. मग हिंदुस्थानच्या मोठ्या २०० कंपनींची लिस्ट काढा. त्यांच्या मालकांची लिस्ट काढा. त्यामध्ये मला दाखवा की, ओबीसी कोण आहेत. एक ओबीसी, दलित, आदिवासी या कंपन्यांमध्ये नाहीत.

भारताचं सरकार ९० अधिकारी चालवतात. बजेट वाढतं. महाराष्ट्रात पैसा येतो. तामिळनाडूत पैसा जातो. बजेटला ९० लोक वाटतात. हेच लोक पैसा कुठे जाईल, हे ठरवतात. ९० नावांमध्ये एक नाव दलित आहे. एक नाव आदिवासी आहे. ३ नावे ओबीसी आहेत. मोठ्या विभागात हे लोक नाहीत. आबोसींसाठी तुम्ही काय केलं, हे मोदींनी सांगा. शेतकरी, गरिबांसाठी मोदी सरकारने एकही योजना आणली नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com