Mahendra Dalvi cash video : रायगड राजकारणात खळबळ: दळवींचा पैशांचा व्हिडीओ हेतुपुरस्सर व्हायरल केल्याचा शिंदे गटाचा दावा
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पैशांच्या बंडलांसह असलेल्या व्हिडीओनंतर सुरू झालेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
थोरवे म्हणाले की, हा व्हिडीओ जाणीवपूर्वक अधिवेशनाच्या काळात व्हायरल करण्यात आला. रायगडमध्ये चालणाऱ्या राजकारणाचा विचार केला तर या प्रकरणामागे सुनील तटकरेंचा हात असण्याची शक्यता जास्त आहे. “आम्ही घरातच शत्रू पाळलाय. रायगडमध्ये सुनील तटकरे आणि राज्यात राष्ट्रवादीच्या रूपाने आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो,” असे ते म्हणाले. त्यांनी दावा केला की तटकरे आणि अंबादास दानवे यांनी एकत्र येऊन हा व्हिडीओ प्रसारित केला असावा. दळवी असे काही करणार नाहीत, हा व्हिडीओ हेतुपुरस्सर व्हायरल करण्यात आला आहे, असेही थोरवे म्हणाले.
दुसरीकडे, शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी तर आणखी एक दावा करत सांगितले की दळवींचा व्हिडीओ हा एआयने बनवलेला आहे आणि आमच्याविरोधात कट रचला जातो आहे. दरम्यान, अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ एक्सवर शेअर करत सरकारवर टीका केली होती. “शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, पण आमदारांच्या टेबलावर पैशांचे ढीग कसे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. व्हिडीओत दळवींचा चेहरा दिसत असून, एक व्यक्ती टेबलावर नोटांची बंडलं ठेवताना दिसत आहेत. आता या सर्व आरोपांवर सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

