Beed Railway : बीड-वडवणी मार्गवर शनिवारी रेल्वे इंजिन धावणार, पुणे रेल्वे विभागाच्या नागरिकांना महत्वाच्या सूचना
अहमदनगर–बीड–परळी या रेल्वे प्रकल्पातील बीड ते वडवणीदरम्यान (Beed) नव्याने तयार झालेल्या ब्रॉडगेज मार्गावर 6 डिसेंबर रोजी इंजिन चाचणी पार पडणार आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात काम असलेल्या या विभागाकडे प्रशासनासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुणे रेल्वे विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून चाचणी दरम्यान सुरक्षिततेच्या सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केलं आहे.
पुणे विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, इंजिन 6 डिसेंबरला रन घेतल्यानंतररेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीआरएस) 10 व 11 डिसेंबरला तपासणी तसेच स्पीड चाचण्या होणार आहेत. या तपासण्यांमध्ये ट्रॅकची गुणवत्ता, गाडीचा वेग सहन करण्याची क्षमता, ब्रेकिंग आणि तांत्रिक सुरक्षितता या विविध घटकांची तपासणी करण्यात येईल. चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक असल्यास या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, रेल्वे ट्रॅकजवळील गावांमधील नागरिक, शेतकरी आणि गुरेढोरे मालकांना चाचणीच्या दिवशी विशेष जागरूक राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ट्रॅकच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण, भटकणारी जनावरे किंवा अनधिकृतरीत्या ट्रॅक ओलांडणं टाळावं असं आवाहन करण्यात आले आहे. चाचण्यांदरम्यान वेगाने धावणाऱ्या इंजिनमुळे अपघाताचा धोका वाढू शकतो, याची जाणीव ठेवून नागरिकांनी ट्रॅकपासून सुरक्षित अंतर राखण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. चाचण्यांसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत हाय-स्पीड रन आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे या काळात ट्रॅक परिसर संवेदनशील राहणार असून कोणतीही बेपर्वाई धोकादायक ठरू शकते, असं रेल्वे विभागाने नमूद केलं आहे.
त्याचबरोबर परिसरात कोणतेही अडथळे, जनावरे किंवा अनधिकृत हालचाली आढळल्यास त्वरित दूर करण्याचं आवाहन स्थानिक संस्थांना करण्यात आले आहे. बीड–वडवणी रेल्वेमार्गाचा विकास हा मराठवाड्यातील प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. चाचण्या सुरळीत पार पडल्यास या विभागाला प्रत्यक्ष रेल्वेसेवेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल उचललं जाईल. त्यामुळे या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांचं सहकार्य आवश्यक असल्याचे पुणे विभागाने स्पष्ट केलं आहे.
