Shivsena & MNS Seat Sharing : ठाकरेबंधूची मातोश्रीवर बैठक; शिवडीचा तिढा सुटला, विक्रोळी, भांडूप, दादर... वॉर्डांवर चर्चेला सुरुवात
MNS-Thackeray group : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील युतीबाबत हालचाली वेगाने सुरू आहेत. दोन्ही पक्षांमध्ये बहुतांश प्रभागांचे वाटप आधीच ठरले असले, तरी काही भागांमध्ये अजूनही मतभेद होते. दादर, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी या भागांतील काही प्रभागांवरून चर्चा अडली होती.
सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 याबाबतचा वाद मिटला. या ठरावानुसार शिवडीतील दोन प्रभाग ठाकरे गटाकडे, तर एक प्रभाग मनसेकडे देण्यात आला आहे. या बैठकीला मनसेचे बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. सर्वांनी एकत्र चर्चा करून शिवडीतील जागावाटप निश्चित केले.
यानंतर आता भांडूप, विक्रोळी, दादर आणि माहीम या भागांतील उरलेल्या प्रभागांवर चर्चा सुरू आहे. विक्रोळी आणि भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 109, 110, 114 आणि 115 या जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. तसेच दादर आणि माहीम परिसरातील वॉर्ड क्रमांक 192, 193 आणि 194 यांवरही दोन्ही पक्षांची मागणी आहे. या विषयावर तोडगा काढण्यासाठी विशाखा राऊत, अनिल देसाई, आमदार सुनील राऊत आणि खासदार संजय दिना पाटील हे मातोश्रीवर उपस्थित असून मनसेचे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत चर्चा करत आहेत. आजच दिवसभरात जागावाटप अंतिम होऊन युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गट आणि मनसे यांची अधिकृत युती आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते. यासाठी मोठ्या पत्रकार परिषद किंवा मेळाव्याचे नियोजन सुरू आहे. गोरेगावमधील नेस्को, बांगुर नगर मैदान किंवा वरळी डोम या ठिकाणांपैकी एका ठिकाणी हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय आज घेतला जाणार आहे. याशिवाय इतर महानगरपालिकांमधील जागावाटपाच्याही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत.
दरम्यान, भांडूपमध्ये वॉर्ड क्रमांक 114 वरून तणाव वाढलेला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावकर हे या जागेवरून आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. तर मनसेकडून माजी नगरसेविका अनिषा माजगावकर यांच्यासाठी ही जागा राखावी, अशी मागणी केली जात आहे. अनिषा माजगावकर 2012 साली येथून निवडून आल्या होत्या, मात्र 2017 मध्ये रमेश कोरगावकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 114 कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

