Bhagat Singh Koshyari : 'राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत', भगतसिंह कोश्यारींचा खळबळजनक दावा
मुंबई/नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्यावर भाषिक मुद्द्यावरून केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. “रटाळ प्रवचनांच्या राजकीय टीका-टिप्पणी करू नका,” असे सुनावत राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. यानंतर भाजपच्या गोटातून जोरदार प्रतिक्रिया उमटली असून माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट टीका केली आहे. वरळी डोम येथे आयोजित संघाच्या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी “लोक घाबरून अशा कार्यक्रमांना येतात” असा टोला लगावला होता. तसेच “सत्ता गेल्यानंतर हे लोक तिथे जातील का?” असा प्रश्न उपस्थित केला होता.
यावर प्रतिक्रिया देताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “संघाच्या कार्यक्रमाला आलेली सर्व लोकं नरेंद्र मोदींना घाबरलेली नसतील. मी राज ठाकरे यांचा सन्मान करतो, पण मला वाटतं ते मोदींना जास्तच घाबरले आहेत.” त्यांनी पुढे सल्ला देत म्हटले, “मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा. प्रभू श्रीरामासारखे नरेंद्र मोदी सर्वांना समान मानतात.” छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहणाऱ्यांनी कोणाला घाबरण्याची गरज नाही, चुकीच्या कामांना मात्र घाबरावे, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत “हा शंभर टक्के घातपात आहे” असा आरोप केला होता. त्यावर कोश्यारी म्हणाले, “अजित पवार मोठे नेते होते. माझ्यावर टीका झाली तरी त्यांनी कधीही माझ्यावर टीका केली नाही. मी त्यांना कधीच विसरणार नाही.” घातपाताबाबत शंका असल्यास सरकारकडे अधिकृत चौकशीची मागणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
नाशिक दौऱ्यात बोलताना कोश्यारी यांनी त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी परिसरातील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता अयोध्येसारखा धार्मिक कॉरिडॉर उभारण्याची मागणी केली. “मी 40 वर्षांपूर्वीही येथे आलो होतो. मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथेही अयोध्येसारखा विकास व्हायला हवा,” असे ते म्हणाले. कोश्यारी यांच्या या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले असून मनसे आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
