Raj Thackeray MNS Meeting : ...असा मोर्चा झाला पाहिजे ; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
थोडक्यात
न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे,
दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा
राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
महाराष्ट्रात मतदार याद्यांमधील गैरव्यवहारांचा आरोप करत विरोधकांनी आता रस्त्यावर उतरायचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा काढण्यात येणार असून महाविकास आघाडीसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील या आंदोलनात सामील होणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक घेतली. बैठकीला बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, गजानन काळे, यशवंत किल्लेदार यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी नेत्यांना स्पष्ट संदेश दिला “हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे.खोट्या मतदारांना नाही, खऱ्या मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. मोर्चा असा असावा की गल्ली ते दिल्ली दखल घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी आयोजन भव्य आणि प्रभावी करण्याचे आदेश दिले असून तयारीला वेग आला आहे.
दरम्यान, मतदार यादीतील गोंधळावरून ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीत तब्बल 96 लाख खोटे मतदार असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यानुसार, फक्त मुंबईतच 8 ते 10 लाख आणि ठाण्यात 8 ते 8.5 लाख संशयित नावे असल्याचे ते म्हणाले. पुणे आणि नाशिकमध्येदेखील मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला मागणी केली की, मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत आणि सर्व पक्ष समाधानी होईपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नयेत. या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरचा मोर्चा राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणार हे निश्चित आहे.
