Viral Video Raj Thackeray : दहीहंडी निमंत्रणावर राज ठाकरेंचं मिश्किल टिप्पणी “मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो”
राज्यभर जल्लोषात साजरा होणारा दहीहंडी उत्सव यंदाही रंगतदार होण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एल्फिन्स्टन रोड प्रभादेवी परिसरात आयोजित दहीकाला उत्सवासाठी आयोजक आणि मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना औपचारिक निमंत्रण दिले. मात्र, या निमंत्रणावर राज ठाकरेंनी दिलेलं मिश्किल उत्तर सध्या सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे.
मुनाफ ठाकूर यांच्याकडून निमंत्रण स्वीकारताना राज ठाकरे हसत-हसत म्हणाले, “मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो!” त्यांच्या या हलक्याफुलक्या प्रतिक्रिया ऐकून उपस्थितांमध्येही हशा पिकला. सध्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मटण विक्री बंदीच्या निर्णयावरून राज्यात वाद सुरू आहे, त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं हे वक्तव्य सूचक राजकीय टोला मानला जात आहे. राज ठाकरे यांची ही विनोदी शैली नवी नाही. ते अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा भाषणांमध्ये मिश्किल टिप्पण्या करून वातावरण हलकं करत असतात. यावेळीही, दहीहंडीच्या पारंपरिक निमंत्रणाला मटण हंडीचा ट्विस्ट देऊन त्यांनी आपली खास शैली कायम ठेवली.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे केवळ उत्सवाचं महत्त्व वाढलं नाही, तर सध्या सुरू असलेल्या मटण विक्री बंदीवरील चर्चेलाही एक वेगळं वळण मिळालं आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की ते योग्य प्रसंगी विनोदाच्या माध्यमातूनही राजकीय संदेश पोहोचवण्यात पटाईत आहेत. येत्या काही दिवसांत होणाऱ्या दहीहंडी सणात, ‘मटण हंडी’चा हा उल्लेख नेमका किती चर्चेत राहतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.