SanjayGhadi : राज ठाकरेंचे जुने सहकारी संजय घाडी मुंबईचे उपमहापौर

SanjayGhadi : राज ठाकरेंचे जुने सहकारी संजय घाडी मुंबईचे उपमहापौर

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेनंतर आज महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेनंतर आज महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. महायुतीच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदी, तर शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चे संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड जाहीर करण्यात आली. भाजप आणि शिवसेनेने महापालिका निवडणूक युतीत लढवली होती. महायुतीला एकूण ११८ जागांवर विजय मिळाला असून त्यात भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ नगरसेवक आहेत.

बैठकीत शिवसेना नेते राहुल शेवाळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केली. उपमहापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. वॉर्ड क्रमांक १३२ मधून निवडून आलेल्या रितू तावडे या मुंबईच्या नव्या महापौर ठरल्या आहेत. तर दहिसरमधील वॉर्ड क्रमांक ५ चे नगरसेवक संजय घाडी यांच्यावर उपमहापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संजय घाडी यांची राजकीय वाटचाल विशेष लक्षवेधी ठरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ते एकेकाळचे जवळचे सहकारी आणि मित्र मानले जात होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. २००७ मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा घाडी हे त्यांच्यासोबत होते आणि मनसेकडून निवडणूकही लढवली होती. नंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि नगरसेवक म्हणून निवडून आले.

मागील वर्षी एप्रिलमध्ये संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका संजना घाडी यांनी उद्धव ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. अलीकडेच ते पुन्हा वॉर्ड क्रमांक ५ मधून विजयी झाले आणि आता उपमहापौरपदाची धुरा त्यांच्याकडे आली आहे.

संजय शंकर घाडी (वय ५७) यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई महानगरपालिका शाळेत सातवीपर्यंत झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये घेतल्यानंतर त्यांनी फोर्ट येथील सिध्दार्थ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी शिक्षण पूर्ण केले. १९८८-८९ मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे १९९०-९१ मध्ये मुंबई विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. मनसेचे राज्य सरचिटणीस, शिवसेना उपनेते आणि सध्या रायगड जिल्हा संपर्कप्रमुख अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. मुंबई महापालिकेतील या नव्या सत्तासमीकरणामुळे शहराच्या प्रशासनात कोणते बदल होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शैक्षणिक आणि संघटनात्मक अनुभव

संजय शंकर घाडी (वय ५७) यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई महानगरपालिका शाळेत सातवीपर्यंत झाले. दादरच्या छबिलदास हायस्कूलमधून दहावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी शिक्षण घेतले.

१९८८-८९ मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे १९९०-९१ मध्ये मुंबई विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली. मनसेचे राज्य सरचिटणीस, शिवसेना उपनेते आणि सध्या रायगड जिल्हा संपर्कप्रमुख अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत.

मुंबई महापालिकेतील या नव्या सत्तासमीकरणामुळे शहराच्या प्रशासनात काय बदल घडतील, विकासकामांना कोणती दिशा मिळेल आणि विरोधकांची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या कारभाराला नवे वळण मिळणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com