Rajan Salvi: ठाकरे गटाच्या राजन साळवी यांचा निर्णय काय? उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिली महत्त्वाची माहिती
राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असताना, राजन साळवी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ असल्याचे राजन साळवी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मतदारसंघातील कामाबद्दल भेटीत चर्चा केली तसेच कार्यकर्त्यांच्या भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माझ्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहचवल्या आहेत- राजन साळवी
पुढे राजन साळवी म्हणाले की, गेले 2 दिवस माझ्या मतदार संघातल्या राजापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यानंतर लांजा मतदार संघातल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. आज मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मतदार संघामध्ये ज्या-ज्या घटना घडत होत्या, ज्या गोष्टी मला माझ्या मतदार संघातल्यांनी सांगितल्या, त्या लोकांच्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहचवल्या आहेत. त्यांनी त्यासर्व घटना ऐकून घेतल्या आणि त्यावर ते योग्य तो निर्णय घेतील. अशा माझ्या अपेक्षा आहेत.
घटनाक्रमाबद्दल मी नक्कीच नाराज होतो पण... - राजन साळवी
पुढे राजन साळवी म्हणाले की, 2006 साली झालेला पराभव आणि 2024मध्ये झालेला आताचा पराभव यात खूप फरक आहे. घटनाक्रमाबद्दल मी नक्कीच नाराज होतो, ज्या भावना असतील ती मत मांडली असतील, मी आता उद्धव साहेबाकडे सर्व भावना मांडल्या आहेत. यावेळी संजय राऊत, मिलिंद नार्वेकर सर्व होते आणि मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे. असं म्हणतं राजन साळवी यांनी आपली जी काही नाराजी होती ती त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेटून बोलल्याचं ते म्हणाले आहेत.
