Raksha Bandhan Trafic Jam : रक्षाबंधनाचा आनंद वाहतूक कोंडीत अडकला; लाडकी बहिण-भावाचा सण सिग्नलवर थांबला
रक्षाबंधन हा सण म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचा उत्सव. पण यंदा ठाणे, मुंब्रा, भिवंडी, कल्याण परिसरात वाहतूक कोंडीमुळे अनेक बहिणी व भावांना वेळेवर एकमेकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले. सणासुदीच्या गोड क्षणांची प्रतीक्षा करत निघालेल्या कुटुंबांना ट्रॅफिकच्या लांबलचक रांगांनी अडवून धरले.
विशेषतः मुंब्रा टोल नाका, खारेगाव व भिवंडी मार्गावर गाईमुख-घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहन ठप्प झाली. 8 ऑगस्ट मध्यरात्रीपासून 11 ऑगस्ट सकाळी 5 वाजेपर्यंत भारी वाहनांना या मार्गावर बंदी असली तरी, पॅच रिपेअर कामामुळे उर्वरित मार्गावरही कोंडी निर्माण झाली.
सणात काम का? लोकांचा प्रश्न
अनेकांनी सणासुदीच्या काळात रस्त्यांच्या कामांना टाळावे, असे सांगितले. “लोक भावंडांना भेटायला निघतात, अशावेळी अशा कोंडीने सणाची गोडी निघून जाते,” असा नागरिकांचा सूर होता. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण-भावाच्या भेटीतला गोड क्षण लांबलचक वाहनरांगांमध्ये अडकून पडला. सण साजरा झाला, पण काही राख्या वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत, हे मात्र खेदाने सांगावे लागते.