तब्बल २१ वर्षांनी राज्यात शिक्षकेतर पदांची भरती

तब्बल २१ वर्षांनी राज्यात शिक्षकेतर पदांची भरती

शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरतीअंतर्गत सुमारे ५ हजार पदांची भरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक या संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह १०० टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. शिक्षक भरतीच्या धर्तीवर शिक्षकेतर पदांनाही एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीची अट लागू करण्यात आली असून, या निर्णयामुळे शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरतीअंतर्गत सुमारे ५ हजार पदांची भरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने शिक्षकेतर भरतीसंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागू करण्यात आला आहे. विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहायक ही नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द करून त्याऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. मात्र, नियमित नियुक्तीने कार्यरत चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत राहणार आहेत.

शिक्षकेतर पदे रिक्त राहिल्याने ती कामे शिक्षकांना करावी लागतात. त्याचा अध्यापन, शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर, शिक्षकेतर संवर्गातील काही पदांच्या नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तसेच भरती प्रक्रियेबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com