Washim : जामखेड गावावर पसरली शोककळा! मंदिराला सोडलेल्या नंदीबैलाच्या जाण्याने गावकऱ्यांचा अश्रू अनावर
वाशिम जिल्ह्यातील जामखेड गाव आज दुःखात बुडालंय वर्षानुवर्षे गावातील श्री जागृत हनुमान संस्थान मंदिराला सोडलेला भक्तांचं प्रेम जिंकणारा लाडका नंदीबैल ‘श्याम’अखेर गावकऱ्यांना सोडून निघून गेला. जामखेडचा श्याम हा फक्त एक नंदीबैल नव्हता, तर गावाचा जीव होता. मंदिराच्या आवारात बसून त्याच बरोबर घरोघरी फिरून भक्तांना दर्शन देणारा, लाड करून घेणारा, आणि गावातील मुलांसोबत खेळणारा हा नंदीबैल गावाच्या हृदयात घर करून होता.
काही दिवसांपासून श्याम आजारी होता. तरुण मंडळी, ग्रामस्थ या सगळ्यांनी मिळून औषधोपचार केले. त्याला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न झाले. पण नियतीसमोर कुणाचं काही चाललं नाही. श्यामच्या जाण्याने गावकऱ्यांचे अश्रू अनावर झाले गावभर शोककळा पसरली. डोळ्यांत पाणी, मनात वेदना. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर हळहळ होती.
एकीकडे गावकरी श्यामाला फुलांनी सजवून अंतिम यात्रा काढत महादेवाच्या नावाचा गजर करत गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला. आरती-पूजन, भजनी मंडळींचं कीर्तन आणि भावनिक वातावरणाने जामखेड गाव थरारून गेलं होत. गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू जणू संपूर्ण गावाने आपला जिवलग गमावला आणि श्यामाच्या आठवणी गावाच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. जामखेडच्या श्यामासारखा नंदीबैल लाडका सोबती गावाला पुन्हा मिळणार नाही. पण त्याच्या आठवणी कायम सैदव राहतील.