International News : टेक्सासमध्ये हनुमानाच्या पुतळ्यावरून वाद; रिपब्लिकन नेत्याच्या वक्तव्याने हिंदू समाज आक्रमक
थोड्यात
अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शुगर लँड येथे उभारण्यात आला.
भगवान हनुमानाच्या 90 फुटी पुतळ्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
या पुतळ्याला विरोध दर्शवून तो “खोट्या देवाचा पुतळा” असल्याचे वक्तव्य केले.
International News : अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शुगर लँड येथे उभारण्यात आलेल्या भगवान हनुमानाच्या 90 फुटी पुतळ्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते अलेक्झांडर डंकन यांनी या पुतळ्याला विरोध दर्शवून तो “खोट्या देवाचा पुतळा” असल्याचे वक्तव्य केले. यामुळे हिंदू समाजासह विविध धार्मिक गटांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
“खोटा देव” असा उल्लेख
श्री अष्टलक्ष्मी मंदिराच्या आवारात उभारण्यात आलेला “स्टॅच्यू ऑफ युनियन” हा उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच हनुमानाचा पुतळा मानला जातो. या पुतळ्याचा व्हिडिओ शेअर करताना डंकन यांनी “आपण खोट्या हिंदू देवाचा खोटा पुतळा टेक्सासमध्ये का उभा करतो आहोत? अमेरिका हे ख्रिश्चन राष्ट्र आहे,” असे लिहिले.
इतकेच नव्हे तर, त्यांनी बायबलमधील काही उतारे उद्धृत करून मूर्तीपूजेला विरोध दर्शवला. त्यांनी “You must not have any other god but me...” असा Exodus 20:3-4 मधील उतारा तर “They traded the truth about God for a lie...” असा Romans 1:25 मधील उतारा प्रसिद्ध केला.
हिंदू अमेरिकन फाउंडेशनची प्रतिक्रिया
डंकन यांच्या वक्तव्यावर हिंदू अमेरिकन फाउंडेशनने (HAF) तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी या वक्तव्याला “हिंदूविरोधी आणि भडकाऊ” असे संबोधले आणि टेक्सास रिपब्लिकन पक्षाकडे औपचारिक तक्रार दाखल केली.
“आपल्या पक्षाच्या उमेदवाराने जाहीरपणे धार्मिक द्वेष पसरवला आहे. हे आपल्या स्वतःच्या भेदभावविरोधी नियमांच्या विरोधात असून, अमेरिकेच्या संविधानातील फर्स्ट अमेंडमेंटलाही विरोधी आहे,” असे फाउंडेशनने म्हटले.
नागरिकांचा रोष
डंकन यांच्या वक्तव्यावर नेटिझन्सकडूनही प्रचंड टीका होत आहे. अनेकांनी अमेरिकेच्या संविधानाने दिलेल्या “धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराची” आठवण करून दिली.
एका वापरकर्त्याने लिहिले, “तुम्ही हिंदू नाही म्हणून तो खोटा देव होत नाही. वेदांचे लिखाण येशूच्या २००० वर्षे आधी झाले असून त्यातले विचार आजही अद्वितीय आहेत.”
तर आणखी एका वापरकर्त्याने म्हटले, “अमेरिका विविध धर्मांचा देश आहे. जोपर्यंत एखादा धर्म इतरांना हानी पोहोचवत नाही, तोपर्यंत तो अमेरिकन संविधानानुसार सुरक्षित आहे.”
स्टॅच्यू ऑफ युनियन’बद्दल
हा पुतळा श्री चिन्नजीयर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला असून, १८ ऑगस्ट २०२४ रोजी त्याचे अनावरण झाले. ९० फुटी हनुमानाचा हा पुतळा उत्तर अमेरिकेतील सर्वांत उंच मानला जातो. राम आणि सीतेला पुन्हा एकत्र आणण्यात हनुमानाने निभावलेल्या भूमिकेच्या प्रतीक म्हणून या पुतळ्याला “स्टॅच्यू ऑफ युनियन” असे नाव देण्यात आले आहे. भक्ती, सेवा आणि एकतेचा संदेश या पुतळ्याद्वारे देण्यात आला असून, तो भावी पिढ्यांसाठी आध्यात्मिक केंद्र ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.