Property Donate To Temple : मुलींकडून अपमानास्पद वागणूक; निवृत्त जवानाचा टोकाचा निर्णय, 4 कोटींची संपत्ती केली दान
तामिळनाडूतील अरणीजवळील केशवपुरम गावातील निवृत्त लष्करी जवान एस. विजयन (वय 65) यांनी भावनिक धक्क्यामुळे घेतलेल्या निर्णयाने त्यांचे कुटुंबीय आणि स्थानिक मंदिर प्रशासन चकित झाले आहे. पत्नीपासून विभक्त होऊन गेल्या दशकभर एकटेच राहणारे विजयन यांनी 4 कोटी रुपये किमतीची दोन मालमत्ता अरुल्मिघू रेणुगांबाळ अम्मन मंदिराला दान केली.
ही देणगी केवळ भक्तिभावाने नव्हे, तर मुलींकडून वारंवार झालेल्या अपमानामुळे त्यांनी दिली आहे. विजयन यांनी सांगितले की, त्यांच्या मुली वारंवार मालमत्तेच्या वाटणीसाठी दबाव टाकत होत्या आणि दैनंदिन गरजांमध्येही मदत करत नव्हत्या. त्यामुळे भावनिकदृष्ट्या खचून त्यांनी संपूर्ण जीवनभराच्या संपत्तीचा त्याग करून तो देवीच्या चरणी अर्पण केला.
24 जून रोजी मंदिराच्या दानपेटी (हुंडी) तपासणीदरम्यान मंदिर कर्मचाऱ्यांना दोन मालमत्तांचे मूळ दस्तऐवज सापडले. एक मंदिराजवळील 3 कोटींचे घर आणि भूखंड, तर दुसरे 1 कोटींचे जमीन क्षेत्र. या कागदपत्रांसोबत विजयन यांची एक चिठ्ठीही होती, ज्यात त्यांनी ही देणगी पूर्णपणे स्वेच्छेने केली असल्याचे नमूद केले होते.
मंदिराचे कार्यकारी अधिकारी एम. सिलंबरासन यांनी स्पष्ट केले की, फक्त हुंडीत दस्तऐवज टाकल्याने मंदिराला मालकी हक्क मिळत नाही. त्यासाठी विधिसंगत नोंदणी आवश्यक आहे. विजयन यांनी मंदिर अधिकाऱ्यांना सांगितले की, ते लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालमत्ता मंदिराच्या नावे नोंदवतील.
दरम्यान, विजयन यांच्या कुटुंबीयांनी ही देणगी थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र विजयन आपल्या निर्णयावर ठाम असून म्हणाले, “देवीनेच मला साथ दिली, ही माझी संपत्ती तिच्या चरणी अर्पण करतोय".