Rishabh Pant Social Media Post : पाचव्या कसोटीतून ऋषभ पंतची एक्झिट! दुखापतीवर अखेर सोडलं मौन; म्हणाला, "देशासाठी खेळणं..."

Rishabh Pant Social Media Post : पाचव्या कसोटीतून ऋषभ पंतची एक्झिट! दुखापतीवर अखेर सोडलं मौन; म्हणाला, "देशासाठी खेळणं..."

दुखापतीनंतर तयारी, ऋषभ पंतची देशासाठी खेळण्याची जिद्द
Published by :
Shamal Sawant
Published on

भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतने अखेर आपल्या दुखापतीवर मौन सोडले आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांतून बाहेर पडल्यावर त्याने सांगितले की, "फ्रॅक्चर बरे झाल्यानंतर मी पुन्हा तयारी करणार आहे." मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी, क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करताना चेंडू पायाला लागल्याने त्याला फ्रॅक्चर झाले. त्यावेळी तो ३७ धावांवर खेळत होता.

वेदनांमुळे लगेचच त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. स्कॅननंतर फ्रॅक्चर स्पष्ट झाले आणि त्याला सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी तो पुन्हा फलंदाजीसाठी उतरला आणि अर्धशतक झळकावले. अखेरच्या दिवशी देखील तो खेळण्यास तयार होता, परंतु वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाने सामना वाचवला.

ऋषभ पंतने X वर लिहिले, "मला मिळणारे प्रेम आणि शुभेच्छांनी मला खूप बळ दिलं. मी संयम बाळगतो आहे आणि पुन्हा पूर्ण ताकदीने परतण्यासाठी माझ्या दिनचर्येचे काटेकोर पालन करत आहे. देशासाठी खेळणे हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न आहे. मी लवकरच परत येईन."

BCCI ने रविवारी अधिकृत निवेदनात पंतच्या दुखापतीची पुष्टी केली असून तो 31 जुलैपासून ओव्हल येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटीत खेळणार नाही. वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहे.

पंतच्या जागी नारायण जगदीशनची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत पंतने सात डावांत 479 धावा केल्या असून त्यात दोन शतके आणि एक अर्धशतक सामील आहे. लॉर्ड्समध्ये त्याने 74 धावांची झुंजार खेळी करताना हाताला मार सहन केला होता. त्याची ही झुंजारता टीमसाठी अमूल्य ठरली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com