Rohit Pawar : अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा सवाल; गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA ला ई-मेल

Rohit Pawar : अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा सवाल; गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA ला ई-मेल

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित करत आमदार Rohit Pawar यांनी केंद्र सरकारकडे सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित करत आमदार Rohit Pawar यांनी केंद्र सरकारकडे सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री Amit Shah, नागरी उड्डाणमंत्री Ram Mohan Naidu तसेच Directorate General of Civil Aviation (DGCA) यांना प्रेझेंटेशनसह ई-मेल पाठवून सर्व शंका मांडल्या आहेत.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या अपघाताबाबत तथ्यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात काही मुद्दे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. त्यामुळे वस्तुस्थिती जनतेसमोर यावी आणि कोणतीही शंका राहू नये, यासाठी निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. पवार यांनी संबंधित केंद्रीय मंत्र्यांची आणि DGCA अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले. मात्र, अधिवेशनाच्या व्यस्ततेमुळे गृहमंत्री आणि नागरी उड्डाणमंत्री यांची भेट होऊ शकली नाही. DGCA कडूनही वेळ मिळाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. “यंत्रणांनी वेळ दिला नसला तरी आम्ही सर्व माहिती ई-मेलद्वारे पाठवली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या मते, पत्रकार परिषदेनंतर तपास प्रक्रियेला काही प्रमाणात वेग आला आहे. तरीही अपेक्षित गतीने तपास होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अपघाताच्या कारणांबाबत तांत्रिक तपशील, हवामान परिस्थिती, विमानाची स्थिती आणि नियंत्रण यंत्रणांची भूमिका यासंबंधी अनेक मुद्दे त्यांनी मांडल्याचे समजते. रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले की, “अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका निर्माण झाल्या असून त्या तथ्यांसह जनतेसमोर मांडल्या आहेत. प्रेझेंटेशनसह सर्व शंका गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA यांना ई-मेलद्वारे पाठवून सखोल चौकशीची विनंती केली आहे.”

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणात सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला पडलेल्या प्रश्नांची वस्तुनिष्ठ उकल होईल, असा त्यांना विश्वास आहे. “सत्तेत नसतानाही आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा करत आहोत. राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षानेही या प्रकरणात सक्रिय भूमिका घ्यावी,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणातही चर्चा रंगली आहे. विमान अपघातासारख्या गंभीर घटनेबाबत पारदर्शक आणि वेगवान चौकशी होणे गरजेचे असल्याचे विविध स्तरांतून मत व्यक्त होत आहे. आता संबंधित यंत्रणा या ई-मेलला काय प्रतिसाद देतात आणि पुढील तपासाची दिशा काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com