Rose Gold Jewellery : सोन्याच्या वाढत्या दरात ‘रोज गोल्ड’चा ट्रेंड; 'रोझ गोल्ड'च्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती..

Rose Gold Jewellery : सोन्याच्या वाढत्या दरात ‘रोज गोल्ड’चा ट्रेंड; 'रोझ गोल्ड'च्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती..

सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खरेदीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

गेल्या वर्षभरात सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खरेदीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. अशातच व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रिय व्यक्तीला खास आणि मौल्यवान भेट द्यावी, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र वाढत्या किमतीमुळे पारंपरिक सोन्याचे दागिने घेणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. त्यामुळे आता ग्राहकांचा कल ‘रोज गोल्ड’ दागिन्यांकडे वाढताना दिसत आहे.

सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरात सध्या रोज गोल्ड दागिन्यांचे आकर्षक कलेक्शन दाखल झाले आहे. गुलाबी छटांचा नाजूक आणि स्टायलिश लूक असलेले रोज गोल्ड दागिने तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत. अंगठ्या, पेंडंट सेट, ब्रेसलेट, हलक्या वजनाचे नेकलेस आणि कानातले अशा विविध प्रकारांमध्ये रोज गोल्डचे डिझाईन्स उपलब्ध झाले आहेत.

ज्वेलर्सच्या मते, पारंपरिक सोन्याच्या तुलनेत रोज गोल्ड दागिने तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. विशेषतः व्हॅलेंटाईन डे निमित्त तरुण वर्ग आपल्या जोडीदाराला वेगळ्या आणि ट्रेंडी स्टाईलची भेट देण्यास प्राधान्य देत आहे. रोज गोल्डचा सौम्य गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक मानला जात असल्याने या दिवसासाठी तो अधिक योग्य पर्याय मानला जातो. याशिवाय रोज गोल्ड दागिने आधुनिक आणि वेस्टर्न आउटफिट्सवर सहज उठून दिसतात. ऑफिसवेअर किंवा कॅज्युअल लूकसाठीही हे दागिने परफेक्ट ठरतात. त्यामुळे एकाच दागिन्याचा विविध प्रसंगी वापर करता येत असल्याने ग्राहकांना त्याचा अधिक फायदा होत आहे.

जळगावातील अनेक सराफ व्यावसायिकांनी व्हॅलेंटाईन स्पेशल ऑफर्सही जाहीर केल्या आहेत. काही ठिकाणी मेकिंग चार्जेसमध्ये सूट, तर काही ठिकाणी खास गिफ्ट पॅकेजिंगची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये आकर्षक आणि मौल्यवान भेट देण्याचा पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध झाला आहे. एकूणच, सोन्याच्या वाढत्या दरामुळे पारंपरिक दागिन्यांऐवजी रोज गोल्ड हा पर्याय ग्राहकांना अधिक परवडणारा आणि स्टायलिश वाटत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्णनगरीत रोज गोल्ड दागिन्यांची वाढती मागणी हेच याचे उदाहरण म्हणावे लागेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com