Kolhapur Shahi Dasara : तोच थाट तोच उत्साह! कोल्हापुरात शाही दसरा सोहळा धूमधडाक्यात पार; सोनं लुटण्यासाठी कोल्हापूरकरांची झुंबड
कोल्हापुरात आज शाही दसरा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. यंदा कोल्हापूरच्या दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.
त्यातच म्हैसूरपाठोपाठ कोल्हापूरचा दसरा हा जगभर प्रसिद्ध असल्याने हा सोहळा पाहण्यासाठी कोल्हापूरच नव्हे तर राज्यातून देखील लोक या ठिकाणी येत असतात. दरम्यान सूर्यास्तावेळी सहा वाजून 18 मिनिटांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करण्यात आले आहे.
कोल्हापूरमध्ये दसऱ्याला शाही पद्धतीने ऐतिहासिक दसरा चौकात सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो, जिथे शाहू महाराजांच्या काळापासून आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा आहे. आजही सोनं, म्हणजेच आपट्याची पानं लुटण्यासाठी कोल्हापूरकरांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. या परंपरेचा भाग म्हणून, विजयादशमीच्या दिवशी लोकांची दसरा चौकात आपट्याची पाने लुटण्यासाठी गर्दी होते, जी एकमेकांना "सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा" असे म्हणत दिली जातात.