Rule Changes From August 1 : आजपासून 'या' नियमांत होणार मोठे बदल; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
(Rule Changes From August 1) ऑगस्टपासून नवीन महिना सुरू होत आहे. नव्या महिन्याची सुरुवात ही अनेकदा बदलांची नांदी ठरते. ऑगस्ट 2025 च्या पहिल्याच दिवशी काही महत्त्वाचे नियम अंमलात आले आहेत. स्वयंपाकाचा गॅस, कमर्शिअल गॅस, सीएनजी-पीएनजीसह अनेक वस्तूंच्या किमती आणि नियमांमध्ये बदल होणार आहे.ऑगस्ट महिन्यातील या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. अशा स्थितीत तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती असली पाहिजे. 1 ऑगस्टपासून तुमच्यासाठी काय बदल होणार आहेत.
1. युपीआय व्यवहारांवर नवीन मर्यादा
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युपीआय व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत म्हणून काही सुधारित नियम लागू केले आहेत. एका युपीआय खात्यावरून दिवसात ५० वेळांपेक्षा जास्त वेळा बॅलन्स चेक करता येणार नाही.ऑटोपे मँडेट व अॅड्रेस API वापरासंबंधी अतिरिक्त सुरक्षा उपाय अंमलात आणले आहेत.हे बदल सिस्टिम स्थिरतेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
2. विमान इंधन दरवाढ; तिकीट दरही वाढणार
हवाई प्रवास करणार्यांसाठी ही बातमी थोडी झळ पोहचवणारी आहे.ऑगस्टपासून एव्हिएशन टर्बाईन फ्युएल (ATF) च्या दरात 2677.88 रुपये प्रति किलोलीटर इतकी वाढ झाली आहे.सलग दुसऱ्या महिन्यात होणाऱ्या या दरवाढीचा थेट परिणाम विमान भाड्यांवर होणार आहे.
3. कमर्शियल गॅस स्वस्त, घरगुती सिलेंडर दर 'जैसे थे'
व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडर दरात 33.50 रुपयांची घट झाली आहे. दुसऱ्या महिन्यात सलग कमी झाल्यानं छोट्या व्यवसायिकांना याचा फायदा होणार. मात्र, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
4. पीएनबी ग्राहकांसाठी केवायसीची अंतिम संधी
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी केवायसीसंदर्भात अंतिम अलर्ट देण्यात आला असून ज्या खातेदारांनी 30 जूनपूर्वी KYC पूर्ण केलेलं नाही, त्यांना 8 ऑगस्टपर्यंत संधी दिली आहे. यानंतरही KYC प्रक्रियेत अयशस्वी ठरलेल्यांच्या खात्यांवर मर्यादा येऊ शकतात.
5. SBI क्रेडिट कार्डवर विमा कव्हर बंद
एसबीआयने आपल्या प्रीमियम क्रेडिट कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा बदल केला आहे. 'एलीट', 'प्राईम' किंवा इतर विशिष्ट व्हेरिएंटच्या कार्डवर पूर्वी देण्यात येणारा 1 कोटी रुपयांचा एअर अॅक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर आता रद्द करण्यात आला आहे.