Russia And Ukraine War : रशियाचा युक्रेनच्या राजधानीवर थेट प्रहार, युद्धात मोठी घडामोड?
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस धगधगत चालले आहे. नुकताच रशियाने युक्रेनवर पुन्हा एक मोठा हल्ला केला असून यावेळी लक्ष्य ठरले ते राजधानी किव. या कारवाईमुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. आता युक्रेनकडून यावर काय उत्तर दिले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या युद्धाला थांबवण्यासाठी अमेरिका सातत्याने प्रयत्न करत असली तरी आतापर्यंत त्यात कोणतेही यश आलेले नाही. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत शांतता व सहकार्य यांचे संदेश दिले जात असतानाच रशियाने असा जोरदार मारा केल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यातील हल्ल्यांपेक्षा हा हल्ला अधिक तीव्र असल्याचे सांगितले जात आहे. या भीषण हल्ल्यात एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून किमान चार जणांचा जीव गेला आहे. दहा हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री रशियाने किव शहरावर ड्रोन व क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. यावेळी तब्बल 595 स्फोटक ड्रोन आणि 48 क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीने तत्काळ कार्यवाही करत 566 ड्रोन व 45 क्षेपणास्त्र अडवून पाडले. मात्र उर्वरित क्षेपणास्त्र व ड्रोन राजधानीत आदळल्याने जीवित आणि वित्तहानी झाली.
या घटनेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, या हल्ल्यात किवसह जापोरिज्जिया, खमेलनित्सकी, सूमी, मायकोलाइव, चेर्निहिव आणि ओडेसा हे प्रदेशही लक्ष्य केले गेले. “संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रशियाने केलेला हा हल्ला म्हणजे जगाला त्यांचा खरा चेहरा दाखवण्याचा प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियावर कठोर दबाव आणला पाहिजे,” असे झेलेन्स्की म्हणाले. सध्या युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, पुढील काही दिवसांत युद्धाच्या घडामोडींमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.