Sahyadri Hospital : सह्याद्री ग्रुपचा ताबा मणिपाल कंपनीकडे; तब्बल 6 हजार 400 कोटींचा करार
पुणे तसेच पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटलची साखळी असलेला सह्याद्री ग्रुप मणिपाल हेल्थ एन्टरप्रायजेसने तब्बल 6 हजार 400 कोटीला खरेदी केले. मणिपाल हेल्थने सह्याद्री हॉस्पिटल्सला विकत घेऊन पश्चिम भारतात आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
सह्याद्री हॉस्पिटल्सच्या साखळीचा ताबा आतापर्यंत कॅनडाच्या ऑंटीरिओ टीचर्स पेन्शन प्लॅन या कंपनीकडे होता. कॅनडाच्या या कंपनीने 2022 मध्ये अडीच हजार कोटी रुपये मोजून सह्याद्री हॉस्पिटल्सचा एव्हरस्टोन या कंपनीकडून मिळवला होता. मात्र आता मणिपालने दुप्पट किंमत मोजून सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा आपल्याकडे मिळवला आहे. सह्याद्री महाराष्ट्रामधील सर्वात मोठ्या खासगी रुग्णालय साखळ्यांपैकी एक मोठी साखळी मानली जाते. मणिपालने या डीलमध्ये फोर्टिस, एस्टर डीएम हेल्थकेअर आणि स्वीडनची प्रायव्हेट इक्विटी फर्म EQT यांसारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे. यामध्ये ऑन्टारियो टीचर्स पेन्शन प्लॅनसाठी (OTPP) ही एक चांगली डील ठरली आहे. यामध्ये त्यांनी 2.6 पट पैसे कमावले. भारतीय आरोग्य क्षेत्रात हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
मणिपाल हेल्थ एन्टरप्रायजेस मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर विस्तार करताना दिसत आहे. 2023 मध्ये कोलकाताच्या AMRI हॉस्पिटलमध्ये 84 टक्के भागीदारी करत 2 हजार 400 कोटीला विकत घेतली होती. मणिपाल हेल्थ एन्टरप्रायजेसला सिंगापूरच्या रामटेक आणि अमेरिकेच्या TPG capital यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे समर्थन आहे. सह्याद्री हॉस्पिटल्सची स्थापना 2004 मध्ये झाली होती. सध्या पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि कराड या ठिकाणी मिळून सह्याद्री ग्रुपची अकरा हॉस्पिटल्स आहेत. या हॉस्पिटल्समध्ये तेराशे बेड्स, अडीच हजार आरोग्य कर्मचारी आणि साडेतीन हजार सपोर्ट स्टाफ कार्यरत आहे. या डीलमुळे या संपादनामुळे मणिपालच्या एकूण बेडची संख्या 12 हजारांपर्यंत पोहोचेल. ज्यामुळे ते भारतातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल नेटवर्कपैकी एक बनणार आहे. मात्र असे असले तरी सह्याद्री हॉस्पिटलसची नोंदणी धर्मादाय संस्थेअंतर्गत असल्याने यामध्ये आधी काही योजना राबवणे बंधनकारक होते. मात्र यात आता खासगीकरण झाल्याने सामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवा खर्चिक होण्याची शक्यता आहे.