Cough Syrup : 'त्या' कफ सिरपच्या विक्रीवर 1 ऑक्टोबरपासून घातली बंदी
थोडक्यात
कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ
तामिळनाडू सरकारने ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपच्या विक्रीवर 1 ऑक्टोबरपासून बंदी
बाजारातील साठा परत मागवला
(Cough Syrup) मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांचा मृत्यू तमिळनाडूत उत्पादन होणाऱ्या एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली असून या औषधावर बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
तामिळनाडू सरकारने ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपच्या विक्रीवर 1 ऑक्टोबरपासून बंदी घातली असून याच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या अन्नसुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.
7 सप्टेंबरपासून छिंदवाडा जिल्ह्यात 9 मुलांचे संशयितरीत्या मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यू झाल्यानंतर कफ सिरपच्या विक्रीवर राज्यभर बंदी घातली असल्याची माहिती मिळत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीच्या औषधाच्या नमुन्यांची अन्नसुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असून एका कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली आहे. या कंपनीला कफ सिरपचे उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून स्पष्टीकरण मागवले आहे.