Sanjay Raut : मुंबईत वक्फच्या जमिनीवर मोठ्या उद्योगपतीच घर; राऊतांचा खळबळजनक दावा
नुकतेच लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेल्या वक्फ सुधारण विधेयकावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वक्फच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. 'कुठलेली मुद्दे हिंदुत्वसोबत जोडून भाजप वातावरण खराब करत आहे,' असे संजय राऊत रविवारी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांनी यावेळी भाजपला खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, "हिंदूंना मूर्ख समजता का तुम्ही, वक्फ बोर्डाचे जमिनी तुम्हाला हडप करायच्या आहेत. मोठ्या उद्योगपतींना या जमिनी देण्यासाठी हे सुरू आहे. सार्वजनिक जमिनी उद्योगपतींना विकून झालेत. त्यामुळे आता वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली. भविष्यात या जमिनी भाजप नेते आणि उद्योगपतींच्या घशात घालणार. मी सत्य बोलतो म्हणून माझ्यावर टीका होते," असे त्यांनी नमूद केले.
"२०२५ पर्यंतच्या मशीद आणि मदरशांना हात लावणार नाही. पण रिक्त जमिनी विकून गरीब मुस्लिमांना पैसे देणार, असे अमित शहा म्हणाले. अमित शाह आता खरेदी-विक्रीवर आले आहेत. उद्या उठून सगळ्यांच्याच जमिनी विकल्या जातील," असा टोला राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच त्यांनी भाजपच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, "भाजपची सथापना आमच्या समोर झाली. मूळ शिवसेना भाजपला सिनियर आहे. तेव्हा एका उदात्त हेतूने यांचा जन्म झाला. ज्यांनी जन्म घातला ते तुरुंगात आहेत. आताची भाजप मूळ भाजप नाही," असे राऊत म्हणाले.