Sanjay Raut On Jagdeep Dhankhar : संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ! सप्टेंबरमध्ये कोणते मोठे बदल होणार?
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल अचानकपणे तब्येतीचे कारण देऊन आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या या राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकारणात खूप मोठी खलबते झाली. अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर दर्शवल्या. त्यातच शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर आपले मत नोंदवले. संजय राऊतांना जगदीप धनखड यांचा राजीनामा म्हणजे वादळापूर्वीची शांतता वाटत आहे. येणाऱ्या काळात भारतीय राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याचा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला.
काल अचानकपणे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थामुळे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा एका पत्राद्वारे त्यांनी जाहीर केला. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी खळबळजनक प्रतिक्रिया नोंदवली. त्यांच्या म्हणण्यानुसार ते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांची प्रकृती इतकीही खराब नाही की त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मी त्यांच्याबरोबर याआधीही होतो त्यामुळे मला त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी अधिक माहिती आहे.
ते अतिशय स्वस्थ आणि आनंदी राहणारे व्यक्ती असून खर पाहता उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे मैदान सोडणारे लढवय्ये नसून मैदानात आपली खिंड लढवणारे लढवय्ये आहेत. त्यांच्या या अचानक राजीनामा देण्यामागे खूप मोठे राजकारण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. येणाऱ्या सप्टेंबरमध्ये दिल्लीमध्ये कोणते तरी मोठे राजकीय वादळ येणार हे नक्की आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठे प्रयत्न चालू असून येणाऱ्या काळात भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ शक्य आहे असे ते त्यावेळी म्हणाले.
भाजप पक्ष आपल्या देशात विरोधकांना ठेवणार नाही. नक्कीच सप्टेंबर महिन्यात काहीतरी होणार, हे लक्षात ठेवा, असेही संजय राऊतांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. येत्या काळात राजकारणात कोणते मोठे बदल होतील हे येणारा काळच ठरवेल.