Sanjay Raut : तुम्ही पक्ष फोडले ते ईडी आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले

Sanjay Raut : तुम्ही पक्ष फोडले ते ईडी आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले

इंदापुरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा होता.
Published by :
Siddhi Naringrekar

इंदापुरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा होता. या मेळाव्यातून संजय राऊत यांनी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, मला आनंद आहे की इंदापुरात सुप्रिया ताईंच्या प्रचारासाठी मला इथं येता आलं. पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादीचा मार्ग स्विकारतो. माणूस घाबरला समोरचा, पराभवाची भिती वाटायला लागली, लोकं आपल्याला स्विकारणार नाहीत याचं भय वाटायला लागलं की मग तो मोदींचा मार्ग सुरु होतो. की धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. धमक्या कशा द्यायच्या आम्हाला माहित आहेत. आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलो आहोत. तुम्हाला धमक्या नवीन असतील. आम्ही धमक्या घेतोसुद्धा आणि आम्ही धमक्या देतोसुद्धा. त्यामुळे धमक्या वैगरे हा प्रकार सध्या सुरु आहे. हा डरपोकपणा आहे. धमक्या समोर येऊन कुणी देत नाही. धमक्या नेहमी फोनवर दिल्या जातात. तुमचं अस्तित्व फार थोडं आहे. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल पण तुम्हाला मुंबईत यायचं आहे हे लक्षात ठेवा. मुंबईला यायचं आहे, ठाण्याला यायचं आहे. रस्ता आमचाच आहे. कुणाला धमक्या देता आहेत. पवार साहेबांच्या माणसाला धमक्या देता आहेत की शिवसेनेच्या माणसाला धमक्या देता आहेत. आम्ही घाबरणारे लोकं नाहीत. मर्दांची सभा आहे. डरपोक होते ते पळून गेले.

संजय राऊत पुढे म्हणाले, सुप्रिया सुळेंचं मी सकाळी भाषण वाचलं त्या म्हणाल्या की, मला पण भिती वाटतं. मला ही अटक होईल. अटक करु शकतात. रोहित दादाला, युगेंद्रला. अडवून सांगितले जातं तुम्ही प्रचार करु नका. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून येऊन दाखवा बारामतीतून. ही लढाई बारामतीची नाही महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. ही फक्त पवार साहेबांची आणि सुप्रिया ताईंची लढाई नाही आहे. आम्ही इथं वारंवार येतो आहोत. याआधी सुप्रिया ताईंच्या प्रचाराला फार कमीवेळा आलो आम्ही इथं. आम्हाला माहित आहे इथं प्रचाराची गरज नाही आहे. आताही नाही प्रचाराची गरज. बारामतीचं कुणी गुजरात करु पाहत असेल तर इथं शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहिल. आमचं गुजरातशी भांडण नाही. पण सध्या जी वृत्ती आहे त्या वृत्तीला कुठतरी हा पायबंद घातला पाहिजे. माणूस राजकारणातल्या विकासावर बोलतो. विकासावर मत मागतो. आपण केलेल्या कामावर मत मागतो. तुम्हाला धमक्या द्यायची वेळ का येते कारण लोकं तुमच्या बरोबर नाही आहेत. हे लक्षात घ्या.

देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते. देवेंद्र फडणवीस हे परवा काय म्हणाले, मी पुन्हा आलो. आणि कसा आलो तर दोन - दोन पक्ष फोडून आलो. राजकारणातला माणूस सांगतो, मी रस्ते केले, मी इमारती बांधल्या, मी लोकांना शिक्षण दिलं, मी लोकांना आरोग्यविषयक सुविधा दिल्या आणि म्हणून मी राजकारणात आलो. पण हे महाशय म्हणतात, मी आलो. दोन - दोन पक्ष फोडून आलो. मी त्यांना सांगू इच्छितो, 4 महिन्यांनी देशातील सरकार बदलणार आहे. आमची गॅरंटी आहे. महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसतील. सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही पक्ष फोडले ते ईडी आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले. ती यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे. तुमच्या पक्ष शिल्लक राहतोय का पाहा. लक्षात ठेवा. आमचे मित्र इथं हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. मगाशी बाळासाहेब थोरात यांना त्यांची आठवण झाली. त्यांना शांत झोप लागते. मला वाटत नाही गेल्या काही दिवसांपासून ते शांत झोपले असतील. त्यांना शांत झोप लागूदे अशी मी प्रार्थना करतो. पण जर त्यांना स्वाभिमान असेल जर मराठी म्हणून अस्मिता असेल जर या महाराष्ट्रावर प्रेम असेल तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरु असताना कोणत्याही मराठी नेत्याने आणि मराठी माणसानं शांत झोपू नये. जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

माझं त्यांना आव्हान आहे उतरा मैदानात या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांच्या मनातील अस्वस्थता आम्हाला जाणवते आहे. त्यांच्या जीवनातील शांतता भारतीय जनता पक्षाने खत्म करुन टाकली आहे. हा पक्ष कुणालाही शांत आणि सुखी झोप लागू देणार नाही. फक्त दोघांनाच शांतपणे झोप लागते दिल्लीमध्ये. नाहीतर जिथे केजरीवाल गेले, जिथे हेमंत सोरेन गेले, ज्या तुरुंगात आम्हाला ठेवलं त्या तुरुंगात तुम्हाला शांत झोप लागेल ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही. काहीच भाव नाही. भाव कोणाला आहे, भाव गद्दार आमदाराला आहे. भाव गद्दार खासदाराला आहे आणि आमच्या कांद्याला भाव नाही. आमच्या कष्टकऱ्यांच्या मालाला भाव नाही. मोदींनी काय सांगितले होते. 2014 साली की, शेतकऱ्यांचे उत्पन्न आम्ही डबल करु. मी असं म्हणतो आम्हाला ते अच्छे दिन नको आहेत. 2014च्या आधीचे अच्छे दिन आम्हाला परत द्या. तुमचे अच्छे दिन आम्हाला नको आहेत आणि त्यासाठी ही लढाई आहे. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूतीत पुढे चालली आहे. कुणाला वाटत असेल ते शिवसेनेतील असतील, काँग्रेस पक्षातील असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असतील की आम्ही गेल्यामुळे आमचा प्रवास थांबला, राजकारण थांबलं. सगळं काही अडलं. असं नाही आहे. अजित पवार गेल्यामुळे झाडाचं पानही हललं नाही.

एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली. आणि अशोक चव्हाण गेल्यामुळे आदर्श टॉवर काही खाली आला नाही तो तसाच आहे. तुमच्याशिवाय ही बारामती अडलेली नाही, हा महाराष्ट्र अडलेला नाही. पण यापुढे जे महाविकास आघाडीतून सोडून गेलेत त्यांच्या जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये ही जनता अडथळा आणल्याशिवाय राहणार नाही. जे गेले ते गेले त्यांच्याशिवाय आपण पुढे निघालेलो आहोत. त्यांच्याशिवाय ही जनता आपल्या पाठिशी आहेत. कृषीमंत्री असताना पवार साहेबांनी 71 हजार कोटींचे कर्ज माफ केलं होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत महाविकास आघाडीतून तेव्हा 2 लाखाचं कर्ज माफ केलं होते. या भारताचा आधार या बारामतीमध्ये शरद पवार साहेबांच्या रुपानं कायम उभा आहे म्हणून हा महाराष्ट्र आणि हा देश अभिमानाने महाराष्ट्राची ओळख सांगतो आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागा महाविकास आघाडी जिंकेल. पण यात सर्वात पहिल्या क्रमांकावर बारामती आणि सुप्रिया ताई असायल्याच पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com