Sanjay Raut
Sanjay RautSanjay Raut

Sanjay Raut : मुंबईत भाजपाला रोखण्यासाठी संजय राऊतांचा दिल्लीत फोन, महाविकास आघाडीची रणनीती

भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
Published by :
Riddhi Vanne
Published on

Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अजूनही सक्रिय आहे. मुंबईत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जागा वाटपाच्या चर्चेला अंतिम टप्पा आलाय. त्याचवेळी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात फोनवर चर्चा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र राहावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रयत्नशील आहे. संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात आज फोनवर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये मतांची फाटाफूट होऊ नये आणि भाजपला प्रतिकार करायचा असेल, तर महाविकास आघाडी एकत्र राहणं गरजेचं आहे, असा संदेश राऊत यांनी राहुल गांधींना दिला आहे. काँग्रेस पक्षाने मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला असला, तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे, यावर संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची युती जवळपास जाहीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. आता लवकरच या युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांचे संबंध प्रगाढ होत असून, महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याची तयारी आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, खासकरून शरद पवार यांच्या गटाने देखील महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंशी युती करण्यावर सकारात्मक दृषटिकोन ठेवला आहे.

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा

काँग्रेस पार्टीच्या मुंबई प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याचवेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे.

संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचे महत्त्व सांगितले आहे. आता काँग्रेस काय निर्णय घेते, हे पाहणं महत्वाचं ठरेल. मुंबईत 227 जागांसाठी निवडणूक होणार आहे, ज्यासाठी या सर्व घडामोडींना पुढे येणारा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल.

थोडक्यात

  • महाविकास आघाडी एकत्र राहावी, यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष) अजूनही सक्रिय.

  • मुंबईत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जागा वाटपाच्या चर्चेला अंतिम टप्पा आला आहे.

  • चर्चेत महत्त्वाचे निर्णय आणि सीट वाटप कसे होईल यावर लक्ष केंद्रीत आहे.

  • शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फोन करून या विषयावर चर्चा केली.

  • महाविकास आघाडीच्या संधी आणि राजकीय संतुलनासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com