वागळेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड कधी काढणार? राऊतांचा पुणे पोलीस आयुक्तांना थेट सवाल

वागळेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड कधी काढणार? राऊतांचा पुणे पोलीस आयुक्तांना थेट सवाल

पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शुक्रवारी (९ फेब्रुवारी) भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
Published by :
shweta walge

पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शुक्रवारी (९ फेब्रुवारी) भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. राष्ट्र सेवा दल येथील हॉलमध्ये नियोजित निर्भय सभेला जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना धाऱ्यावर धरले आहे. तसेच पोलीस आयुक्तांना थेट सवाल देखील विचारला आहे.

ते म्हणाले की, गेल्या दहा दिवसांपासून मी संपूर्ण महाराष्ट्रातील गुंड जे शिंदेंच्या पक्षात सामील होत आहेत, त्यांना मी जनतेच्या समोर आणत आहे. हे सरकार काय करत आहे? मुख्यमंत्री काय करतायेत? पुण्यात निखिल वागळे, असिम सरोदे विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला झाला. पुण्याच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड काढून मोठा शो केला. मग ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला. त्यांची परेड कधी काढणार, असा थेट सवाल संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केला आहे.

निखिल वागळेंवर हल्ला करणारे कोण गुंड आहेत? कोणत्या पक्षाचे गुंड आहेत हे? 'डर गये कमिश्नर' परेड तर त्यांची व्हायला पाहिजे होती. निखिल वागळे, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई का नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या गुंडांचे समर्थन करत आहेत. या हल्ला करणाऱ्यांची देखील परेड काढली पाहिजे. त्यांनाही हातात बेड्या घालून रस्त्यावर फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त नाही तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते, असा घणाघात त्यांनी केला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करा आणि निवडणुका घ्या

कायदा सुव्यवस्था रसातळात गेली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्य सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. आम्ही सरकारच्या झुंडशाहीला आव्हान देऊ. राष्ट्रपती राजवट लागू करा आणि निवडणुका घ्या, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. सीएए बाबत संजय राऊत म्हणाले की, जे हा कायदा येईल तेव्हा त्यावर चर्चा होईल. जे देशाच्या सुरक्षेच्या हिताचे असेल. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी ते मुख्यमंत्री असताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. सीएए बाबत आम्ही आता चर्चा करणार नाही.

मुख्यमंत्री शिंदे फेकुचंद

मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना करमचंद जासूस असे म्हटले.तसेच अचानक त्यांना गाजर खाऊन जाग आली का? अडीच वर्ष झोपले होते का? अशी टीका केली. यावर संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, आता या फेकुचंदवर कोण विश्वास ठेवणार आहे. हे गुंडांचे सरदार आहेत. हे चोरांची टोळी चालवत आहेत. या मंडळाचे सरदार हे फेकुचंद आहेत. एकेकाळी करमचंद जासूसने देशात चांगले काम केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इतिहास आणि माहिती समजून घ्यावी आणि मग बोलावे. त्यासाठी अभ्यास आणि वाचन असावे लागते. आसपास गुंड नव्हे तर विचारवंत असावे लागतात. रोज चार गुंडांबरोबर बैठका घेऊन बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत.

तुमचं कशात नाव आहे?

जे आज तुरुंगात असायला पाहिजे ते मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. आम्ही चांगली माणसे आहोत. उद्धव ठाकरे हे एक सभ्य, सुसंकृत, विद्वान, ज्यांचे जागतिक छायाचित्र कलेत नाव आहे. मुख्यमंत्र्यांचे कशात नाव आहे? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com