'केजरीवालांविरोधात मोठ्या घातपाताचा कट रचला जातोय' संजय सिंह यांचा खळबळजनक दावा
काही दिवसांपूर्वी ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरु झाली. यापार्श्वभूमीवर आपचे खासदार संजय सिंह यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच अरविंद केजरीवाल यांना अडकवण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळं त्यांना केवळ अटकच होणार नाही तर त्यांच्याविरोधात घातपात करण्याचा मोठा डाव आखला जात आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
मद्य घोटाळाप्रकरणी खासदार संजय सिंह यांना ४ ऑक्टोबर रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना आज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात आणण्यात आलं. यावेळी सुनावणीसाठी नेताना बाजूला उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
आपल्याला कोणी ही माहिती दिली, याबाबत त्यांनी खुलासा केलेला नाही. तसेच केजरीवाल यांच्यासोबत काय घातपात होणार आहे? याचीही माहिती संजय सिंह यांनी दिलेली नाही. दरम्यान, कोर्टानं सुनावणीनंतर संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.