Satara Ramraje Naik Nimbalkar on Ranjeetsingh Nimbalkar : "दुधाचा अभिषेक सोडा, मी गोमूत्र शिंपडणार" रामराजे निंबाळकरांचा रणजित निंबाळकरांवर थेट घणाघात

Satara Ramraje Naik Nimbalkar on Ranjeetsingh Nimbalkar : "दुधाचा अभिषेक सोडा, मी गोमूत्र शिंपडणार" रामराजे निंबाळकरांचा रणजित निंबाळकरांवर थेट घणाघात

फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय कलाटणी मिळाली असून आरोप-प्रत्यारोपांचा सूर अधिक तीव्र झाला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय कलाटणी मिळाली असून आरोप-प्रत्यारोपांचा सूर अधिक तीव्र झाला आहे. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी स्वतःवर झालेले आरोप “मास्टरमाईंडच्या इशाऱ्यावर झाले” असा इशारा देत नार्को टेस्टची तयारी दाखवली होती. यावर प्रत्युत्तर देताना रामराजे नाईक निंबाळकरांनी पत्रकार परिषद घेऊन रणजित नाईक निंबाळकरांना थेट आव्हान दिले आणि गंभीर प्रश्न उपस्थित केले.

रामराजे निंबाळकर म्हणाले की, निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या प्रकरणातील सत्य जनतेसमोर मांडणे आवश्यक होते. 30 वर्षांपासून जनतेची सेवा केल्याचा दावा करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास असल्याचे नमूद केले. “माझं टोपण नाव मास्टरमाईंड ठेवलं, फडणवीसांची सभा रद्द करण्याचा आरोप केला; मात्र या सर्वांमध्ये माझा कुठलाही सहभाग नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. मुलीच्या आत्महत्येचा सखोल तपास व्हावा, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी आणि या घटनेवर एसआयटी गठित करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करत आहोत, असे ते म्हणाले.

फलटण तालुक्यात 277 गुन्हे नोंद झाल्याचा उल्लेख करत “तालुक्याची बदनामी झाली की नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढील काळात हे प्रकरण न्यायालयात नेऊन उच्च न्यायालयात एसआयटीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “लोकांची प्रतिष्ठा, इथली संस्कृती आणि विकासाचा मार्ग माझ्यासाठी महत्त्वाचा आहे,” असेही ते म्हणाले.

आत्महत्येच्या प्रकरणातील हॉटेल, व्हायरल झालेली क्लिप आणि आरोपांची मालिका यांचा संदर्भ देत रामराजे निंबाळकरांनी पुन्हा एकदा रणजित नाईक निंबाळकरांवर निशाणा साधला. “हे असले धंदे करतात आणि मास्टरमाईंड माझ्यावर लावतात. फलटणची अब्रू कुठे राहिली? 2023 पासून मी त्यांचं नाव घेतलं देखील नाही,” असे त्यांनी म्हटले. कोठल्याही राजकीय प्रकरणात स्वतःचा सहभाग नसल्याचे सांगत त्यांनी जयकुमार गोरे आणि ननावरे प्रकरणांचाही दाखला दिला.

रणजित नाईक निंबाळकरांच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या दुधाभिषेकावर त्यांनी उपरोधिक टीका केली. “हा देव आहे का? मी तर गोमूत्र ओतून घेणार,” असे ते म्हणाले. “प्रशासकीय दबावाने लोकांना त्रास दिला गेला, आमची माणसं नष्ट होऊ देणार नाही. सत्ता वापरून पैसे मिळवण्याचा मार्ग काहींना चांगला माहीत आहे,” असा घणाघात करत त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. फलटणमधील या प्रकरणाचा तपास आता अधिक गांभीर्याने होण्याची चिन्हं आहेत. दोन्ही बाजूंकडून जोरदार दावे-प्रतिदावे सुरू असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com