Donald Trump : ट्रम्पच्या आदेशानंतर युक्रेनचा रशियावर मध्यरात्री हल्ला; युद्धस्थितीत तणाव शिगेला
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर युक्रेनकडून रशियावर मोठा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घडामोड समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री झालेल्या या हल्ल्यात रशियाच्या ऊर्जा यंत्रणांना लक्ष्य करण्यात आले. रशियाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, युक्रेनकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात एका परमाणू ऊर्जा केंद्राला आग लागली होती. मात्र तातडीने बचावकार्य सुरू करून ती आग विझवण्यात आली. रशियाने थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांच्या आदेशानंतरच युक्रेनकडून हा हल्ला घडवून आणण्यात आला.
यापार्श्वभूमीवर रशियाने पश्चिमी देशांवरही गंभीर आरोप केले आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सरजेई लावरोव यांनी म्हटले आहे की, पश्चिमी देशांना रशिया-युक्रेन युद्ध संपवायची इच्छा नाही. त्यांचा उद्देशच शांतता चर्चेचा मार्ग बंद करण्याचा आहे. लावरोव यांच्या मते, अमेरिका आणि तिचे सहयोगी देश युक्रेनला अशा अटी घालायला लावत आहेत, ज्यामुळे रशियासोबतची बैठक होऊच नये.
युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर जेलेंस्की यांनीदेखील रशियासोबत चर्चेच्या संदर्भात मोठी अट ठेवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुतिन यांच्यासोबत कोणतीही बैठक घेण्यापूर्वी पश्चिमी देश आणि अमेरिकेने सुरक्षा हमी द्यावी लागेल. या अटीमुळे दोन्ही देशांतील शांतता चर्चेला स्थगिती मिळाली आहे.
दरम्यान, हल्ल्यानंतर रशियाकडून प्रतिहल्ला करण्यात आला असून युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या एका अमेरिकी कंपनीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात काही अमेरिकन कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध करताच डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला आणखी जोरदार कारवाईचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेने भारताविरोधात टॅरिफ वाढवून तणाव निर्माण केल्यानंतर आता रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकेच्या भूमिकेमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. ट्रम्प यांनी तयार केलेल्या चर्चेच्या प्लॅटफॉर्मला युक्रेनने नकार दिला असून रशियानेदेखील युरोपियन सैन्याच्या हस्तक्षेपाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे.
यामुळे रशिया आणि युक्रेनमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून, शांतता चर्चेला प्रत्यक्षात कधी गती मिळते, हे आगामी घडामोडींवर अवलंबून राहणार आहे.