WeatherUpdate : उत्तर भारतात कडाक्याची थंडी, महाराष्ट्रातही थंडीची लाट येण्याची शक्यता
देशभरात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत असून, उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने नागरिकांना अक्षरशः गोठवून टाकले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता असून, अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि चंदीगड या भागांत तापमान झपाट्याने खाली येत असून, कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उत्तर भारतातील या तीव्र थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांत गारठा वाढला असून, पुढील काही दिवसांत थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोंदिया येथे यंदाचा सर्वांत कमी किमान तापमानाचा विक्रम नोंदवण्यात आला असून, येथे तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. धुळ्यात 8 अंश सेल्सिअस, तर नागपूरमध्ये 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात शीतलहरीचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरातही किमान तापमान घटल्याने गारठा वाढला आहे. गेल्या काही दिवसांत किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी काहीशी ओसरली होती. मात्र, मंगळवारी अवघ्या एका दिवसात किमान तापमानात तब्बल तीन अंश सेल्सिअसने घट नोंदवण्यात आली. पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वाढलेले वायू प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. प्रदूषणात झालेल्या वाढीमुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून, हवा अनेक ठिकाणी घातक पातळीवर पोहोचली आहे. प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे.
दुसरीकडे, दक्षिण भारतात मात्र पावसाचे वातावरण कायम आहे. हवामान विभागाने 8 आणि 9 जानेवारी रोजी तामिळनाडूमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच 9 आणि 10 जानेवारी रोजी तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मॉन्सून परत जाऊनही पावसाचे आगमन सुरूच असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या वाढत असून, बदलत्या हवामानामुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
