Cold Wave : कडाक्याची थंडी परतणार; राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा
देशभरात हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीनंतर अचानक वातावरणात बदल होऊन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. झपाट्याने बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तरेकडून थंडीच्या लाटा राज्याच्या दिशेने येत असून त्यामुळे किमान तापमानात लक्षणीय घट होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला असून, जानेवारी महिना सुरू होऊनही पावसाने माघार न घेतल्याने शेतकरी आणि नागरिक दोघेही संभ्रमात आहेत.
राज्यात जळगाव येथे किमान तापमानाची नीचांकी नोंद झाली असून, येथे 9.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यानंतर धुळे येथे 9.6 अंश सेल्सिअस, तर जेऊर येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या तापमान घटीमुळे गारठा वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल.
दुसरीकडे, मुंबईत वायू प्रदूषण हा गंभीर प्रश्न बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून, काल रात्री अनेक भागांत धुळीचे साम्राज्य पाहायला मिळाले. आकाशात स्पष्ट काहीच दिसत नव्हते. वाढत्या वायू प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे चित्र आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, गळ्यात दुखणे अशा तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः मास्क घालूनच घराबाहेर पडावे, तसेच ज्यांना दमा किंवा इतर श्वसनाचे आजार आहेत, त्यांनी मास्कशिवाय बाहेर जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर भारतातही थंडीचा कडाका वाढत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजधानी दिल्लीतील तापमान 5 जानेवारीपर्यंत आणखी खाली जाण्याची शक्यता असून, दिल्ली-एनसीआरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. थंडीच्या लाटेचा इशारा तब्बल पाच राज्यांना देण्यात आला असून, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून, सकाळच्या वेळेत दाट धुक्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
