Himachal Pradesh Floods : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत; 10 जणांचा मृत्यू तर 34 जण बेपत्ता
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात गेल्या 32 तासांत ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 34 जण बेपत्ता आहेत, असे स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (SEOC) ने म्हटले आहे. 2 जुलै रोजी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या एसईओसीच्या मान्सून परिस्थिती अहवालातील अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात 16 ढगफुटी आणि पूर आले आहेत. ज्यापैकी बहुतेक मंडीमध्ये होते.
एसईओसीच्या आकडेवारीनुसार, मंडी हे मान्सूनच्या आपत्तीचे "केंद्र" बनले आहे. "थुनाग, कारसोग आणि गोहर उपविभागातील अनेक भागात, ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले, लोक बेपत्ता झाले आणि मृत्यूमुखी पडले. सियांज (गोहर) मध्ये, दोन घरे वाहून गेली, तर नऊ जणं बेपत्ता झाले, त्यापैकी दोन मृतदेह सापडले आहेत", असे एसईओसीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
कुट्टी बायपास (कारसोग) येथे ढगफुटीमुळे दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे बेपत्ता झाले, तसेच सात जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अहवालात असेही म्हटले आहे की, कारसोग, गोहर आणि थुनाग या बाधित भागात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या पथकांसह मोठे शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
बल्हा गावात (हमीरपूर) व्यास नदीजवळील अनेक कुटुंबे अचानक आलेल्या पुरात अडकली. “पोलिस पथकांनी 30 कामगार आणि 21 स्थानिकांसह एकूण 51 लोकांना वाचवले,” असे एसईओसीने सांगितले.
या ठिकाणी मदतकार्य सुरू असून आपत्कालीन निवारा केंद्रे उभारली जात आहेत. तसेच तंबू, ब्लँकेट आणि अन्न यासारख्या आवश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. धरमपूरच्या त्र्यंबला (सेर्थी) गावात, ढगफुटीमुळे पशुधन आणि मालमत्ता गमावलेल्या 17 कुटुंबांना मदत करण्यात आली.
एसईओसीने माहितील दिली आहे की, "एनडीआरएफ आणि एसडीआरएफ दोन्ही पथके सक्रियपणे गुंतलेली असताना संपूर्ण मंडीमध्ये शोध आणि बचाव कार्य सुरू आहे."
केंद्र सरकार पावसाचे आणि नद्यांच्या पातळीचे निरीक्षण करत आहे. विशेषतः ज्युनी खड सारख्या संवेदनशील भागात, जे सध्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे.
अधिक पावसाचा अंदाज असल्याने, उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थलांतर सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.