Shahrukh Khan : शाहरुख खानला 'किंग'च्या सेटवर दुखापत; काय आहे नेमकं सत्य, जाणून घ्या
बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याच्या दुखापतीच्या बातमीमुळे काही काळ चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. 'किंग' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख गंभीर जखमी झाला असून त्याला अमेरिकेला उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली होती. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर मोठी अपडेट समोर आली आहे. ती चाहत्यांसाठी दिलासादायक आहे.
शाहरुख खानला प्रत्यक्षात कोणतीही नवीन दुखापत झालेली नाही, असे त्याच्या जवळच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. 'किंग'च्या सेटवर पाठीला दुखापत झाल्याची अफवा पूर्णपणे खोटी असून, शाहरुख पूर्णपणे ठणठणीत आहे. त्याच्या जुन्या दुखापतींमुळे कधीमधी त्याला वेदना जाणवतात. त्यावेळी त्याला विशिष्ट उपचार घ्यावे लागतात. त्यामुळेच तो अमेरिकेला गेला होता, असंही सांगण्यात आलं आहे.
‘किंग’ या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर झळकणार आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, राणी मुखर्जी, जॅकी श्रॉफ, अरशद वारसी आणि राघव जुयाल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. या चित्रपटाबाबत बॉलिवूडमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
शाहरुख खान यापूर्वी 'डंकी' चित्रपटात झळकला होता. ज्यात तापसी पन्नू आणि विक्की कौशल यांनीही भूमिका साकारल्या होत्या. डंकीने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केली होती. तर सुहाना खान हिने 'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता वडील आणि मुलगी एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार असल्यामुळे ‘किंग’ चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या शाहरुख खान पूर्णपणे बरा असून, 'किंग'च्या चित्रीकरणाच्या पुढच्या टप्प्याची तयारी लवकरच सुरू होणार आहे. चाहत्यांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.