Shahapur : 'मासिक पाळीचा संशय आणि मुलींना केलं विवस्त्र', शहापूरमधील शाळेत धक्कादायक प्रकार

Shahapur : 'मासिक पाळीचा संशय आणि मुलींना केलं विवस्त्र', शहापूरमधील शाळेत धक्कादायक प्रकार

शाळेतील अमानवी प्रकारामुळे पालकांचा संताप, मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
Published on

महाराष्ट्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील तालुका ठिकाण असलेल्या शहापूरमधून समोर आली आहे. येथील आर. एस. दमानिया विद्यालयातील काही विद्यार्थिनींना मासिक पाळी आल्याचा संशय घेत विवस्त्र करून तपासणी करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या अमानुष प्रकारामुळे संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत मुख्याध्यापिकेला चोहोबाजूंनी घेरले आणि स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पालकांनी थेट मागणी केली आहे की, "मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल झाला नाहीतर आम्ही इथून जाणार नाही." या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, "उद्या या मुलींनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला, तर जबाबदार कोण?"

मुख्याध्यापिकेला जबाबदारीचे भान असूनही त्यांनी अमानवी वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेबाबत विचारले असता, मुख्याध्यापिका फक्त "तक्रार करा मग बघूयात" असे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पालकांनी सांगितले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले, "केवळ रक्ताचे डाग आढळले म्हणून विद्यार्थिनींना विवस्त्र करून तपासणे हे अमानवी कृत्य आहे. संबंधित मुख्याध्यापिकेने राजीनामा द्यावा व शाळेला तात्काळ कुलूप लावावे, तेव्हाच विद्यार्थिनींना न्याय मिळेल."

दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुख्याध्यापिकेविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून, शिक्षण संस्थांमधील अशा अमानवी कृत्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com