Adv. Ujjwal Nikam : 'मराठीत बोलू की हिंदीत?'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला उज्ज्वल निकम यांना प्रश्न, म्हणाले...
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या अधिकाराचा वापर करत राज्यसभेसाठी चार क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना नामनिर्देशित केले आहे. या नव्या नियुक्त सदस्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून ओळखले जाणारे उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टे, परराष्ट्र व्यवहार विभागाचे माजी सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि ख्यातनाम इतिहासकार मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती स्वतः उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना दिली. ही माहिती देताना उज्ज्वल निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला काल फोन केल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला फोन केला आणि मराठी बोलण्यास सुरूवात केली. त्यांनी विचारले की, मी मराठीत बोलू की हिंदीत. म्हणालो, तुमची दोन्ही भाषांवर चांगली पकड आहे. कोणत्यांही भाषेत संवाद साधा. त्यावर त्यांनी मराठी बोलताना राष्ट्रपती माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवू इच्छितात, असे म्हटले.