राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच एकत्र; अजित म्हणाले 'ही साहेबांची इच्छा...'

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच एकत्र; अजित म्हणाले 'ही साहेबांची इच्छा...'

राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र आले आहेत.
Published by :
shweta walge

आज दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थितीत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच एकत्र पहायला मिळाले.

या कार्यक्रमात अजित पवार बोलताना म्हणाले की, पवार साहेबांनी शेती क्षेत्रासाठी कृषी विकास प्रतिष्ठान स्थापन केलं आणि शिक्षणाकरिता विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली. पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये या संस्थेचं मोठं जाळं आहे. इंदापूरमध्येही शाळेची शाखा सुरु झाल्याने इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून सुरु केली.

विद्या प्रतिष्ठान हे एक शैक्षणिक क्षेत्रातलं मोठं नाव आहे. गुणवत्ता जोपासण्यासाठी आणि गरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत असतो. आज अनंतराव पवार इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीचं १ लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम झालेलं आहे. स्वामी चिंचोली इथं शिक्षणासाठी मोठं संकूल उभारलं गेलं आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा आणखी वाढण्यास मदत होईल.'

अजित पवार पुढे म्हणाले की, शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा.. हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. दौंडमध्येही विद्या प्रतिष्ठानची शाळा व्हावी, ही साहेबांची इच्छा आहे. परंतु जागा मिळत नसून लवकरच त्यावर तोडगा काढला जाणार आहे.

अनंतराव पवार यांच्या नावाने ही शाळा आहे. त्यांच्या नावाला साजेसं शिक्षण इथं दिलं गेलं पाहिजे.. जर कुणी कमी पडलं तर माझ्याशी गाठ आहे. इथं शिक्षण घेणारा विद्यार्थी लाथ मारीन तिथे पाणी काढेल, असा घडला पाहिजे, असा दम अजित पवारांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना भरला.

दरम्यान, अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात आहे. दोन्ही पवार गटांमध्ये राजकीय संघर्ष सुरू असताना पवार कुटुंबीय पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com