Sharad Pawar
Sharad Pawar

"महाराष्ट्रात ५० वर्ष आत्मा फिरतोय", नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर शरद पवारांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, "अब तक ५६..."

मला विधानसभेत येऊन ५६ वर्ष झाली. त्यामुळे हा आत्मा ५६ वर्ष महाराष्ट्रात फिरतोय, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोख प्रत्युत्तर दिलं.
Published by :

लोकशाही उध्वस्त होणार नाही, असा निकाल आपल्या सर्वांना द्यायचा आहे. त्याचं कारण मोदींना आम्ही जवळून पाहिलं आहे. तुम्ही मोदींना टीव्हीवर पाहता, एखाद्या सभेत पाहता. आम्ही संसदेत असतो, त्यांच्याशी बोलायची संधी मिळते. त्यांची मानसिकता काय आहे, हे समजून घेण्याची स्थिती मिळते. या निवडणुकीत काहीही झालं तरी चालेल, पण देशात लोकशाही कशी टीकेल, याबाबतची काळजी आपल्याला घ्यायची आहे. देशाचा प्रधानमंत्री महाराष्ट्रात येतो आणि आमच्यावर टीका-टीप्पणी करतो. सोलापूरला मोदी म्हणाले, महाराष्ट्रात गेले ५० वर्षे एक आत्मा फिरत आहे. त्यांना मला सांगायचं आहे, मला विधानसभेत येऊन ५६ वर्ष झाली. त्यामुळे हा आत्मा ५६ वर्ष महाराष्ट्रात फिरतोय, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोख प्रत्युत्तर दिलं. पवार महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते.

मोदींवर टीका करताना पवार पुढे म्हणाले, या ५६ वर्षांत मोदींसारखी व्यक्ती आम्ही पाहिली नाही. आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या. आम्ही पंडीत जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, नरसिंह राव पाहिले. अनेकांसोबत आम्ही काम केलं, त्यावेळी कसलीही चिंता आम्हाला वाटली नाही. सामान्य माणसांच्या लागलेली चिंता दूर करण्यासाठी हा आत्मा महाराष्ट्रात फिरत आहे. गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी आणि महाराष्ट्रातला कांदा पाठवायला परवानगी नाही. कांद्याच्या पिकामुळं गरीब शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात. त्याला आधार द्यायची जबाबदारी सरकारची असते.

मी या खात्याचा मंत्री होतो. तेव्हा कांद्याचे भाव वाढले होते आणि भाजप विरोधी पक्ष होता. तेव्हा भाजप खासदार गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते. माझ्याविरोधात घोषणाही दिल्या होत्या. मी त्यांना सांगितलं, कांदा हे जिरायत शेतकऱ्याचं पीक आहे. त्याला किंम्मत मिळाव्यावर शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील, काहीही झालं तरी कांद्याची किंमत मी कमी करणार नाही. मला कांदा उत्पादकांचं हित बघायचं आहे.

जगातील एका संघटनेनं अभ्यास केला की, महाराष्ट्रात जेव्हा १०० तरुण नोकरी मागायला येतात, त्यापैकी ८७ मुलांना देशात नोकरी मिळत नाही. त्यामुळे देशातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशात नोकरीचा प्रश्न सुटत नाही. शेतमालाच्या किंमतीचा प्रश्न सुटत नाही. तुम्ही प्रश्न सोडवणार नसाल, तर तुम्हाला राज्य कशासाठी द्यायचं? राज्य यांच्या हातात द्यायचं नाही, हा निकाल द्यावा लागेल, असं आवाहनही शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सभेत जनतेला केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com