Gautam Adani : “शरद पवार माझे मेंटोर” गौतम अदानींच्या वक्तव्याने बारामतीतील कार्यक्रम ठरला चर्चेचा विषय
उद्योगविश्वातील दिग्गज गौतम अदानी आणि भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोन प्रभावी व्यक्तिमत्त्वे आज बारामतीत एकाच मंचावर दिसल्याने राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक एआय केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला गौतम अदानी, शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमात गौतम अदानी यांनी केलेले वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरले. “शरद पवार हे माझे मेंटोर आहेत,” असे जाहीरपणे सांगत त्यांनी पवारांच्या कार्याची आणि दूरदृष्टीची मनापासून प्रशंसा केली. अदानी म्हणाले की, “जगात काही ठिकाणे केवळ नकाशावरील ठिपके नसतात, तर ती प्रगती, परिवर्तन आणि संधींची केंद्रे बनतात. बारामती हे असेच एक शक्तिकेंद्र आहे. या शहराच्या विकासामागे शरद पवार यांची दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
गौतम अदानी यांनी पुढे सांगितले की, बारामतीत उभारण्यात आलेले हे एआय सेंटर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवे दालन उघडणारे ठरेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि सामाजिक जबाबदारी या अदानी समूहाच्या ध्येयांवरही त्यांनी भाष्य केले. याच कार्यक्रमात शरद पवार यांनीही गौतम अदानी यांचे कौतुक करत त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख केला. “गौतम अदानी यांनी शून्यातून सुरुवात केली. गुजरातमधील पालमपूर येथून ते मुंबईत आले. खिशात काही नसतानाही कष्ट, चिकाटी आणि धाडसाच्या जोरावर त्यांनी उद्योगविश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले,” असे पवार म्हणाले. मुंबई कष्ट करणाऱ्याला कधी उपाशी ठेवत नाही, याचे उदाहरण म्हणजे गौतम अदानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शरद पवार यांनी पुढे सांगितले की, आज अदानी समूह देशातील 23 राज्यांत कार्यरत असून लाखो लोकांना रोजगार देत आहे. भविष्यातही आणखी लाखो हातांना काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या एआय सेंटरमुळे बारामतीसह संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि तांत्रिक विकासाला चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त करत त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. गौतम अदानींच्या “शरद पवार माझे मेंटोर” या वक्तव्यामुळे हा कार्यक्रम केवळ उद्घाटनापुरता मर्यादित न राहता, राज्याच्या राजकीय आणि औद्योगिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
