Sharad Pawar
Sharad Pawar

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ते सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

जवाहरलाल नेहरुंवर टीका करणारे लोक स्वातंत्र्याच्या आंदोलनात नव्हते. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना लोकशाही स्वातंत्र्याचा विचार कितपत मंजूर आहे, याबाबत शंका आहे. त्याची कारणे अनेक आहेत. ज्यांचा काही संबंध नाही, ज्यांनी काही गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे. अनेक खासदारांना तुरुंगात टाकलं. आमच्या सहकाऱ्यांना तुरुंगात टाकलं आहे. कारण नसताना संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकलं. अनिल देशमुख महारIष्ट्राचे गृहमंत्री होते, त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं. ही स्थानिक उदाहरणे आहे. झारखंडं आदिवासींचं राज्य आहे. तेथिल मुख्यमंत्र्यांनी एका सभेत प्रधानमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका टीप्पणी केली. सत्ताधाऱ्यांनी त्यांना समजून घेण्याऐवजी त्यांना तुरुंगात टाकलं, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ते सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

जनतेला संबोधीत करताना शरद पवार पुढे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे. सामान्य कुटुंबातील अरविंद केजरीवाल दिल्लीचं राज्य उत्तम चालवतात. मुख्यमंत्री म्हणून केजरीवालांनी शिक्षण, आरोग्याच्या उत्तम सुविधा लोकांना दिल्या. लोक दिल्लीत गेल्यावर संसद, राष्ट्रपती भवन दाखवा असं सांगतात तसंच दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी केलेली विकासकामेही आम्हाला पाहायची आहेत, अशी लोकांची भूमिका आहे.

स्वच्छ कारभार आणि तीनवेळा मुख्यमंत्री असणारा व्यक्ती आज तिहारच्या जेलमध्ये आहे. कारण केजरीवालांनी मोदी सरकारवर टीका टीप्पणी केली होती. ही काय लोकशाही आहे, हे काय स्वातंत्र्य आहे का? देशातील घटनेनं सर्वांना सारखे अधिकार दिले आहेत. शेतात मजुरी करणाऱ्या माणसाला जेव्हढा हक्क आहे, तेव्हढाच हक्क देशाच्या राष्ट्रपतीला आहे. हेच स्वातंत्र्य आहे. पण सत्ता हातात आल्यानंतर या लोकांना ही विचारधारा मान्य नाही, असंही शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com