Sharad Pawar : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sharad Pawar : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या दुर्घटनेत विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकली नाही.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या दुर्घटनेत विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकली नाही. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने केवळ पवार कुटुंबच नव्हे तर राज्यातील राजकारणातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजूनही अनेकांना अजित पवार आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. दरम्यान, या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात असून, चौकशीची मागणीही जोर धरत आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणाबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. शरद पवार यांनी यापूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पक्ष विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. मात्र, अजित पवार गटातील नेत्यांनी हा दावा फेटाळत सांगितले की, अशा कोणत्याही चर्चेबाबत आम्हाला माहिती नव्हती आणि अजित पवार यांनी आमच्याशी यासंदर्भात काहीही बोलले नव्हते.

या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्यांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी अवघ्या काही तासांत शपथविधी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी यावरून नैतिकतेचा मुद्दाही उपस्थित केला. याच शपथविधीमुळे पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद देखील उघडपणे समोर आल्याचे दिसून आले.

शरद पवार यांनी यापूर्वीच सूचक विधान करत सांगितले होते की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. शपथविधी होणार आहे, याची माहिती देखील आपल्याला नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पवार कुटुंबातील संवादाचा अभाव आणि राजकीय मतभेद यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. या वेळी माध्यमांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारला असता, शरद पवार यांनी अतिशय थेट आणि स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “मला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल काहीच बोलायचं नाही,” असे म्हणत त्यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

याच संवादात शरद पवार यांनी भारत-चीन सीमेवरील सध्याच्या परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. या गंभीर विषयावर संसदेत सविस्तर चर्चा होणे गरजेचे होते, असे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांनी संसदेत भारत-चीन सीमेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्माण झालेल्या गदारोळावरही शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर राजकारण न करता संसदेत खुली चर्चा होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

एकीकडे अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली शोककळा, तर दुसरीकडे सत्ता, शपथविधी आणि पक्षीय राजकारण यामुळे राज्यातील वातावरण अधिकच तापलेले दिसत आहे. शरद पवार यांच्या “काहीच बोलायचं नाही” या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणातील मौन अधिक बोलके ठरत असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com