Shashikant Shinde : म्हाडातील घरांवरील गैरप्रकारांवर शशिकांत शिंदे सरकारवर बसरले
(Shashikant Shinde) म्हाडामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. म्हाडातील घरांची परस्पर खरेदी करून ती जास्त दराने विकली जात असल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेत केली. शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षाकडून अनेक सूचना मांडल्या जातात, मात्र सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करतात. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नसणे ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप करत शिंदे म्हणाले, सरकारने कर्जमाफीची दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. जाहिरातीत सरकार वेगाने काम करत असल्याचं दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक मुली बेपत्ता होत असून यावर सरकारकडून ठोस उत्तर मिळत नाही. गृहखात्याने याबाबत जबाबदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासन कमकुवत झालं असून ऑनलाइन गुन्ह्यांवर कारवाई होत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र विरोधकांवर मात्र लगेच कारवाई केली जाते, असा आरोप त्यांनी केला.
अनिल देशमुख प्रकरणावर बोलताना शिंदे म्हणाले की, आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल अजून जाहीर झालेला नाही. केवळ सत्तेच्या जोरावर त्यांना अटक करण्यात आली. इतक्या वर्षांच्या सेवेनंतरही त्यांच्याशी अन्याय झाला असल्याचं त्यांनी म्हटलं. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी अजून पकडले गेले नसणे हे गृहखात्याचं अपयश असल्याचं सांगत, एक वर्ष उलटूनही कारवाई न होणं गंभीर असल्याचं त्यांनी नमूद केलं.
शेवटी, राज्यातील अनेक अधिकारी मनमानी करत असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. अशा अधिकाऱ्यांवर मंत्र्यांनी नियंत्रण ठेवावं, गरज असल्यास त्यांची बदली करून शिस्त लावावी, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.

