Mahayuti : मुंबईत 12 जानेवारीला शिंदे-फडणवीस गाजवणार शिवाजी पार्कचं मैदान....

Mahayuti : मुंबईत 12 जानेवारीला शिंदे-फडणवीस गाजवणार शिवाजी पार्कचं मैदान....

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Published on

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीकडून मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ जानेवारी रोजी संध्याकाळी ही सभा पार पडणार असून, या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवरून मुंबईकरांशी संवाद साधल्यानंतर आता महायुतीकडूनही याच मैदानावर शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्कचे मैदान पुन्हा एकदा राजकीय रणांगण ठरणार असून, मुंबईकरांचे लक्ष या सभेकडे लागले आहे. महायुतीच्या या सभेमुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेतून मुंबईतील विकासकामे, सरकारच्या योजना, तसेच आगामी महापालिका निवडणुकांबाबतची भूमिका मांडणार आहेत. विशेषतः मुंबईच्या पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प, रस्ते, जलनिस्सारण, स्वच्छता आणि नागरी सेवांबाबत महायुतीचे व्हिजन या सभेतून मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महायुतीकडून या सभेसाठी जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी महायुतीने शिवाजी पार्कसारख्या ऐतिहासिक मैदानाची निवड केल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. १२ जानेवारीची ही जाहीर सभा मुंबईच्या राजकारणाला नवे वळण देणार का, आणि मुंबईकरांवर फडणवीस-शिंदे यांची साद कितपत प्रभाव टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com