Gulabrao Patil On Hema Malini
Gulabrao Patil On Hema Malini

Gulabrao Patil On Hema Malini : हेमा मालिनीच्या उल्लेखामुळे गदारोळ; जळगावमध्ये गुलाबराव पाटीलांचं वादग्रस्त भाषण

जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मतदारांना उद्देशून केलेल्या उपरोधिक आणि वादग्रस्त विधानामुळे विरोधकांनी टीकेची धार वाढवली आहे. कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी लोकशाहीचा संदर्भ देत म्हटले की...
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीच चर्चा रंगली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मतदारांना उद्देशून केलेल्या उपरोधिक आणि वादग्रस्त विधानामुळे विरोधकांनी टीकेची धार वाढवली आहे. कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी लोकशाहीचा संदर्भ देत म्हटले की, “राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही. आता राजा मतपेटीतून जन्माला येतो. हा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवला.” पुढे त्यांनी मतदानाच्या अधिकारावर भाष्य करताना थेट अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांचे उदाहरण दिले. “डॉ. बाबासाहेबांनी टाटा-बिर्लांपासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वांना एक मताचा अधिकार दिला आहे. हेमा मालिनीला जसा मतदानाचा अधिकार आहे, तसाच आपल्यालाही आहे,” असे त्यांनी सांगितले.

याचवेळी मंचावर उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे पाहत त्यांनी केलेले वक्तव्य अधिकच वादग्रस्त ठरले. “मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा,” असे विधान करताच सभेत एकच खसखस पसरली. या विधानावरून सोशल मीडियावर तसेच राजकीय स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, या भाषणात गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरही नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले, “कोण म्हणतं देवाकडे वर भरावा लागतो? आता खालीच भरावं लागतं. मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची लढाई होती, पण राष्ट्रवादीने भाजपचंच काम केलं. हा कोणता पिक्चर आहे?” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

खडसे यांच्यावर थेट टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “खडसे माझ्यावर नेहमी टीका करायचे—हा असा आहे, तसा आहे. अरे बाबा, मी निवडून आलोय. मी असा-तसा नाही. तुम्ही आम्हाला खूप त्रास दिला. जेलमध्ये टाकलं, आमदार चंद्रकांत पाटलांना त्रास दिला, जिल्ह्यात सगळ्यांनाच हैराण केलं. त्यामुळे आज जे घडतंय ते भोगावंच लागतं.”

भाषणाच्या शेवटी त्यांनी माजी मंत्र्यांवरही उपहासात्मक टिप्पणी केली. “माजी मंत्री सोबत बॅग पकडायला सुद्धा कोणी राहत नाही,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्य आणि टाळ्यांची लाट उसळवली. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे जळगावसह राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटण्याची चिन्हे दिसत असून, विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात

  1. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

  2. जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्यांनी मतदारांना उद्देशून उपरोधिक आणि वादग्रस्त विधान केले.

  3. लोकशाहीचा संदर्भ देत त्यांनी “राजा आता मतपेटीतून जन्माला येतो” असे वक्तव्य केले.

  4. हा लोकशाहीचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवला असल्याचे त्यांनी नमूद केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com