शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोहेंबरला अकरावा स्मृतिदिन आहे. दरवर्षी हजारो शिवसैनिक दादर शिवाजी पार्कवर असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतात.
Published by :
Team Lokshahi

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोहेंबरला अकरावा स्मृतिदिन आहे. दरवर्षी हजारो शिवसैनिक दादर शिवाजी पार्कवर असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. शिवाजी पार्कमध्ये फुलांची सजावट करून बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवण्यात आली आहे. राज्यभरातून अभिवादनासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होणार आहेत.

16 नोहेंबरला संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी दादरला पोहोचले. त्यावेळी शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते आणि नेतेही उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केले. मुख्यमंत्री तिथून बाहेर पडल्यानंतर तिथे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई स्मृतिस्थळावर उपस्थित होते. त्याचबरोबर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शितल म्हात्रे हे देखील उपस्थित होते. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ घोषणाबाजी सुरू होती. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या बाजूला असलेला रॅक तुटला.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थावरुन बाहेर जाण्याची विनंती केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com