Anil Parab : "गृहमंत्रीच कायदा सुव्यवस्थेचे भक्षक" अनिल परब यांचा घणाघात

Anil Parab : "गृहमंत्रीच कायदा सुव्यवस्थेचे भक्षक" अनिल परब यांचा घणाघात

शिवसेना नेते अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

सावली बार प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी ठाम मागणी परब यांनी केली असून, "ज्यांच्या हातात महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था आहे, तेच कायदा पायदळी तुडवतायत," अशी घणाघाती टीका केली आहे.

अनिल परब म्हणाले, "सावली बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटचा परवाना हा केवळ बार आणि रेस्टॉरंट चालवण्यासाठी होता. तिथे डान्सबार सुरू होता, अवैध व्यवसाय चालत होता, अश्लील कार्यक्रम होत होते. मी तीन वेळा याठिकाणी छापे टाकले, पण कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. उलट काल मी पोलिसांकडे गेलो आणि आजच परवाना परत करण्यात आला, म्हणजे चोरी झाल्यावर चोर स्वतःहून मुद्देमाल परत करतायत! मग ही गुन्हेगारी सुटली का?"

"हे सगळं राजकीय दबावाखाली होत आहे," असा गंभीर आरोप करत परब म्हणाले, "पोलिसांवर दबाव आहे म्हणून बार चालकांवर कारवाई होत नाही. जेव्हा एखाद्या सामान्य बारवर छापा पडतो तेव्हा थेट परवाना धारकावरही गुन्हे दाखल होतात. इथे तसे का होत नाही?" परब पुढे म्हणाले, "गृहराज्यमंत्रीच जर कायदा मोडत असतील, तर त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवणं हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे फडणवीसांनी यावर कठोर पावलं उचलली पाहिजेत. राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी गृहराज्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही परब यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, "मी सर्व पुरावे मुख्यमंत्रीकडे दिले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी त्वरित पावलं उचलून संबंधित मंत्र्यावर कारवाई करावी. अन्यथा हे सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा संदेश जनतेत जाईल."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com