Gunaratna Sadavarte on Uddhav Thackeray : सदावर्तेंवर शिवसैनिकांचा आरोप, बक्षीस जाहीर; तीव्र पलटवार
शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ते प्रशांत भिसे यांनी वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करत त्यांच्या कानशिलात लगावणाऱ्याला तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सदावर्ते मराठी भाषेविषयी अपमानास्पद विधाने करतात, असा गंभीर आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी 'लोकशाही मराठी' या माध्यमाशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत असे आरोप फेटाळले असून, ही एक "गल्लीच्या राजकारणाची खेळी" असल्याचा आरोप केला आहे. सदावर्ते म्हणाले, “पोलीस प्रशासन कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करेल, यावर मला विश्वास आहे. वारंवार मला धमक्या येत असल्या तरी कायदा या सर्वांना योग्य जागा दाखवेल.”
त्यानंतर त्यांनी शिक्षणातील विषमता आणि समाजातील दुय्यम वागणुकीचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, “जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, त्यांना गरीबांची व्यथा समजलेली नाही. आज गरीब मुलांना फक्त ५ क्रेडिट्स मिळतात आणि श्रीमंत मुलांना १२. ही शैक्षणिक विषमता अत्यंत अन्यायकारक आहे.” त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि सरस्वती मातेच्या शिक्षणमूल्यांचा उल्लेख करत सांगितले की, “जे शिक्षणाच्या आड येतात, ते समाजाच्या प्रगतीच्या विरोधात आहेत. ही मुलं इंग्रजी शाळांमध्ये शिकतात, आणि गरीबांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये. अशा विषमतेत एमबीबीएस व इंजिनिअरिंगसारख्या स्पर्धांमध्ये गरीब मुलं मागे पडतात.”
मराठी भाषेबाबतच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना सदावर्ते म्हणाले, “मी कधीही मराठीचा अपमान केलेला नाही. हे आरोप खोटे आहेत. यामागे ठरवून बदनामी करण्याचा डाव आहे. आधी संविधान धोक्यात असल्याचं सांगितलं, आता भाषेच्या नावावर तांडव केलं जात आहे.” मराठी सक्तीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, “मराठी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची आहे. लोकांनी स्वीकारलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मतही होते की हिंदी ही राष्ट्रीय स्तरावरची भाषा असावी. पण काही लोकांना इतिहासाची जाणीव नाही.” अखेर, सदावर्ते यांनी भावनिक प्रतिक्रिया देत म्हटले, “आज गरीब, भटक्या-विमुक्त, ऊसतोड कामगार, अनुसूचित जाती, आदिवासी यांच्या मुलांसाठी ही पाच मार्कांची लढाई आहे. माझी हत्या झाली तरी चालेल, पण या मुलांचे हक्क मी सोडणार नाही. आणि जर काही झालं, तर यासाठी जबाबदार उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर कार्यकर्ते असेल.”