Amit Thakarey : नेरूळमध्ये शिवाजी महाराज पुतळा प्रकरण; अमित ठाकरे यांची पोलिसांना स्पष्ट भूमिका
नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय उद्घाटन केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील नोटीस देण्यासाठी पोहोचलेल्या नेरूळ पोलिसांना मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरळ नकार दिला आहे. “नोटीस मी घरी स्वीकारणार नाही, गरज लागली तर मी स्वतः नेरूळ पोलीस स्टेशनला जाईन,” अशा भूमिकेमुळे पोलिसांचे पथक शिवतीर्थाबाहेर प्रतीक्षेत थांबले आहे.
नेरूळ पोलीस ठाण्याने अमित ठाकरे यांच्यासह सुमारे ७० जणांवर जमावबंदीचे उल्लंघन, विनापरवानगी कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी नेरूळ येथील पुतळा चार महिन्यांपासून बंद ठेवल्याने स्वतः जाऊन ‘उद्घाटन’ केले होते. यानंतर त्यांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू झाली.
आज सकाळी नेरूळ पोलीस पथक नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचले. मात्र अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्याने कारवाई प्रक्रिया अडकली. “मी घरी नोटीस घेणार नाही, तुम्हाला काही हवं असेल तर मी पोलीस स्टेशनला हजर राहीन,” असे त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस अधिकारी शिवतीर्थाच्या बाहेरच प्रतिक्षा करत बसल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
दरम्यान, या प्रकरणावर अमित ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. “महाराजांसाठी जर माझ्यावर पहिली केस झाली असेल तर ते माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे,” असे ते म्हणाले. स्थानिक नागरिकांनी पुतळा खुला करण्यासाठी महिनोनमहिने प्रयत्न केले तरी तो बंदच ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “जे नेते चार महिने विमानतळ आणि दहीहंडीला जायला मोकळे होते, त्यांना पुतळ्याच्या उद्घाटनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे मीच उद्घाटन केलं,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, प्रशासन पुन्हा पुतळ्यावर कपडा बांधण्याचा प्रयत्न करेल तर “आम्ही पुन्हा तोच कपडा काढू,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. पोलिसांबाबत बोलताना ते म्हणाले, “पोलिसांचे काम त्यांना करु द्या. त्यांच्यावर वरून दबाव असतो, त्यामुळे त्यांना दोष देणार नाही.” अमित ठाकरे यांच्या नोटीस नाकारण्याच्या भूमिकेमुळे नेरूळ पोलीस पुढील कायदेशीर पावले काय उचलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

