Sanjay Raut On kasab : तुरुंगात कसाबचे भूत ? संजय राऊत यांनी पुस्तकामध्ये केला खुलासा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सध्या खूप चर्चेत असलेले बघायला मिळत आहेत. त्यांचे 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. संजय राऊत यांनी तुरुंगातील घालवलेले दिवस, अनुभव आणि राजकीय घडामोडी या सगळ्यांवर भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी तुरुंगात आलेले अनुभव सांगताना 26/11 च्या हल्ल्यातील दहशवादी अजमल कसाबबद्दलदेखील भाष्य केले आहे. तुरुंगामध्ये अजमल कसाबचे भूत असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. त्याबद्दल संजय राऊत यांनी सविस्तर लिहिले आहे.
संजय राऊत यांनी पुस्तकामध्ये तुरुंगातील अंधश्रद्धेबद्दल लिहिले आहे. तुरुंगामध्ये लेखक आणि पत्रकार रुपेश कुमार सिंह यांच्याशी भेट झाली. यावेळी रुपेश कुमार यांनी तुरुंगामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा असल्याचे सांगितले. मात्र अंदविश्वास कमी करण्यावर प्रशासन मात्र काम करत नव्हते. भूत पळवण्यासाठी पूजा-पाठ केले जायचे अशी माहिती रुपेश कुमार यांनी संजय राऊत यांना दिली होती.
संजय राऊत यांनी पुस्तकात लिहिले की, "मी आणि अनिल देशमुख कसाबच्या बॅरकमध्ये राहत होतो. पण त्याआधीपासून कसाबचे भूत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तेव्हा मी म्हणालो की कसाबला इथून पुण्याला नेले आणि तिकडे त्याला फासावर लटकवले. येरवडा कारागृहात त्याला गाडले. त्यामुळे कसाबचे भूत पुण्यात असायला हवे इथे कसे असेल? मी कसाबचे भूत शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण कधीही त्याचे भूत दिसले नाही. यार्डामध्ये नेहमी लाइट लागते. प्रकाशात भूत फिरकत नाहीत. पण आमच्यासारखे लोक सरकारला भुतासारखे दिसत असतील म्हणून आम्हाला कसाबच्या बॅरकमध्ये ठेवले असावे".
कसाबचे सामान अजूनही तिथेच :
ज्या बॅरकमध्ये कसाबला ठेवले होते त्या खोलीत आजही कसाबचे कपडे, त्याची पाठीवर लटकलेली बॅग आणि एके 47 गन आहे. कसाबच्या सुरक्षेसाठी इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांची एक तुकडी होती आणि त्याच्यासाठीच सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. आतमध्ये मुंगीलाही शिरता येणार नाही, अशी सुरक्षा व्यवस्था होती.